शिरोळ / प्रतिनिधी
आगामी शिरोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मध्ये स्थानिक उमेदवाराला संधी द्यावी,अशी जोरदार मागणी सध्या मतदारांमधून व्यक्त होत आहे.स्थानिक प्रश्न समजून घेणारा आणि नागरिकांशी थेट संपर्क ठेवणारा उमेदवार निवडला जावा, या अपेक्षेने नागरिक एकवटत आहेत.या पार्श्वभूमीवर २५ ते ३० वर्षांपासून प्रभाग क्रमांक ४ मध्ये वास्तव्य असणाऱ्या सौ.साधना प्रविणसिंह माने यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळत आहे.सर्वसाधारण महिला जागेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत असून, प्रभागातील ज्येष्ठ, महिला आणि तरुण मतदारांचा त्यांच्या बाजूने ओघ वाढताना दिसत आहे.सौ.माने यांनी अनेक वर्षांपासून प्रभागातील सामाजिक,शैक्षणिक आणि महिला स्वावलंबनाशी निगडित उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे.त्यामुळे प्रभागातील नागरी समस्यांची आणि महिलांच्या प्रश्नांची त्यांना अचूक जाण आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सौ.माने यांचा शांत, संयमी आणि समतोल स्वभाव तसेच लोकांशी जवळीक ही त्यांची मोठी ताकद आहे.“सौ. साधना माने नेहमीच नागरिकांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात.रस्ते,पाणी,स्वच्छता, प्रकाशयोजना यांसारख्या स्थानिक विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.त्या नगरपरिषदेवर निवडून आल्यास प्रभागातील विकासकामांना निश्चित गती मिळेल,”असे मत अनेक मतदारांनी व्यक्त केले.सौ.माने यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ४ मध्ये निवडणुकीची चुरस वाढली आहे.स्थानिक असलेला उमेदवारच नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करू शकेल,असा एकमुखी स्वर मतदारांमध्ये उमटत आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीत सौ.साधना प्रविणसिंह माने या प्रभागातील एक मजबूत आणि लोकप्रिय दावेदार म्हणून पुढे येत आहेत.