शिरोळ / प्रतिनिधी
पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि लोकप्रिय समाजसेवक बाबा उर्फ प्रतापराव शामराव पाटील यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून निवडणूक लढवावी,अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.सोशल मीडियावर या मागणीच्या पोस्ट्स व्हायरल होत असून,या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.“ना स्वार्थासाठी, ना सत्तेसाठी – फक्त जनतेच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी” या घोषवाक्यासह उभारलेली ही चळवळ पारंपरिक राजकारणाला नवे आव्हान ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.बाबा पाटील हे स्पष्टवक्ते,प्रामाणिक व लोकाभिमुख नेते म्हणून ओळखले जातात. उपसरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावपातळीवर विकासकामे, पारदर्शक कारभार आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेतली होती.त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आत्मीयतेची भावना निर्माण झाली आहे.“आम्हाला बाबा पाटील पाहिजेत” अशी हाक देत मतदारांनी त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी मागणी सुरू केली आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये गेल्या काही वर्षांपासून विकासकामांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे नागरिक नाराज आहेत.या पार्श्वभूमीवर बाबा पाटील यांची संभाव्य उमेदवारी हा मतदारांसाठी आशेचा किरण ठरत आहे.युवकांना संधी, महिलांसाठी सुरक्षितता,ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि मूलभूत सोयीसुविधांवर भर देणार असल्याचे ते सांगतात. दरम्यान, या चळवळीमुळे प्रस्थापित राजकीय गटांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक नेत्यांच्या विरोधात उभा राहणारा हा नव्या विचारांचा चेहरा मतदारांना कितपत भावतो,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.बाबा पाटील यांनी निवडणुकीत उतरायचा निर्णय घेतल्यास प्रभाग क्रमांक ९ मधील राजकारणाचे संपूर्ण समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार,हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष आता या प्रभागाकडे लागले आहे.