हातकणंगले / प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत हातकणंगले विधानसभा मतदारसंघासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून,हा निधी आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू) यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मिळवता आला आहे.या निधीतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये रस्ते,गटारे,सभागृहे, सभामंडप व इतर मूलभूत सुविधांची कामे केली जाणार आहेत.हातकणंगले हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ असून, येथे मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती व नवबौद्ध समाज घटक वास्तव्य करत आहेत. त्यांच्या वस्त्यांमध्ये सुविधा पुरवणे ही काळाची गरज असल्याचे लक्षात घेऊन आमदार डॉ. माने यांनी समाज कल्याण विभागाकडे निधीची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सामाजिक न्याय विशेष सहाय विभागामार्फत हा निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीतून मनपाडळे, संभापूर, तासगाव, मिनचे, नरंदे, शिरोली पू., वडगाव, माले, मुडशिंगी, अतिग्रे, मजले, कुंभोज, रुकडी, साजणी, तीळवणी, रुई, भादोले, इंगळी, रेंदाळ आदी गावांमध्ये विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत.आमदार डॉ. माने हे मतदारसंघात सातत्याने विकासकामांसाठी निधी खेचून आणण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्या या प्रयत्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आमदार विनय कोरे यांचे सहकार्य लाभले आहे.भविष्यकाळातही अधिकाधिक निधी मिळवून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.