इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरामध्ये यंत्रमाग कामगारांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोनस वाटप झाल्यानंतर बाजारपेठांमध्ये खरेदीला मोठा वेग आला आहे. लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधीच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून,संपूर्ण बाजार परिसर गजबजलेला आहे. वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाणारे इचलकरंजी हे कापड व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. शहरामध्ये हजारो यंत्रमाग कारखाने आहेत आणि यामध्ये कार्यरत कामगारांना दरवर्षी दिवाळीपूर्वी बोनस दिला जातो.यंदाही यंत्रमाग धारकांनी मोठ्या प्रमाणावर बोनस वितरित केल्यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे.लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य – रांगोळी,आकाशकंदील, मातीचे दिवे,लक्ष्मीपूजनाचा पुडा,मिठाई, फुले,केळी,ऊस आदी वस्तू खरेदीसाठी दुकानदारांकडे ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.मुख्य रस्ते, गल्लीबोळ,कापड बाजार,शिवाजी चौक,हातगाव चौक या भागांमध्ये वाहनांची व ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.दरम्यान,बाजारपेठांमधून आजवरच करोडो रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून मिळत आहे.आगामी बुधवारी भाऊबीज आणि गुरुवारी पाडवा असल्याने सोनं,चांदी, इलेक्ट्रिक वस्तू,मोबाईल आणि दुचाकी-चारचाकी वाहन खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.यंदा अनेक वस्तूंवरील जीएसटी दरात झालेल्या कपातीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी बाजारासाठी आणि व्यापाऱ्यांसाठी चांगली ठरणार असल्याचे चित्र आहे.