कुरुंदवाड / प्रतिनिधी
नवभारत शिक्षण मंडळ,सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरुंदवाड येथील दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सार्थक हळींगळे व आर्यन सातपुते या दोघांनी विभागीय स्तरावरील स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तर गाठला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सार्थक हळींगळे याने ७९ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला,तर आर्यन सातपुते याने १०० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली.त्यामुळे या दोघांची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ह्या स्पर्धा नाशिक येथे होणार आहेत.सार्थक हा बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून,आर्यन बारावी कला शाखेत शिक्षण घेत आहे. याआधीही त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.सातत्यपूर्ण मेहनत व योग्य प्रशिक्षणाच्या जोरावर त्यांनी ही कामगिरी साध्य केली आहे.या यशाबद्दल श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे.पाटील, क्रीडाशिक्षक एस.एस.गडदे,तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोघांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.संस्थेचे संचालक गौतम पाटील,कार्याध्यक्ष गणपत दादा पाटील,उपसंचालक बी.आर.थोरात,डी.एस. माने,शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले.श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयामधून विविध खेळ प्रकारात गुणवत्ता असलेले खेळाडू घडत असून ही बाब संपूर्ण कुरुंदवाड परिसरासाठी अभिमानास्पद आहे.