कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन टीमची सोलापूर जिल्ह्यात मोलाची कामगिरी
शिरोळ / प्रतिनिधी
महापुरात अडकलेल्या ९८ नागरिकांचे जीव वाचवले; वजीर रेस्क्यू फोर्सची कौतुकास्पद कामगिरी
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, कुर्डीवाडी, करमाळ व माढा तालुक्यात आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.या कठीण प्रसंगी कोल्हापूर येथील आपत्ती व्यवस्थापन टीमने तात्काळ मदतीसाठी धाव घेत मोलाची कामगिरी बजावली आहे.गेल्या दोन दिवसांपासून वजीर रेस्क्यू फोर्सचे प्रमुख रौफ पटेल यांच्या नेतृत्वाखाली २० जणांची बचाव टीम सतत कार्यरत आहे.त्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्य केले आहे.आज अखेर एकूण ९८ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूरहून आलेली ही टीम आधुनिक उपकरणांसह सज्ज असून त्यांनी बोटींमार्फत व दोरांच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांचे विशेष लक्ष ठेवून रेस्क्यू करण्यात आले आहे.स्थानिक प्रशासनासह समन्वय साधून या टीमने जलदगतीने निर्णय घेत संकटग्रस्त भागांमध्ये मदतीचे कार्य सुरू ठेवले आहे.अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह जोरात असूनही, या जवानांनी धाडसाने व समजूतदारपणे परिस्थिती हाताळली.रौफ पटेल व त्यांच्या संपूर्ण टीमचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक नागरिकांनी देखील या जवानांचे आभार मानले असून, वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे अनेकांचे जीव वाचल्याची भावना व्यक्त केली आहे.प्रशासनाच्या वतीने या कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानण्यात आले असून, गरज पडल्यास अधिक मदत मागविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.