इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने शहरात गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत.कचऱ्याचे ढीग रस्त्यावर आणि प्रकल्प परिसरात साचल्याने दुर्गंधी, श्वसनाचे त्रास,डोळ्यांची जळजळ अशा तक्रारींनी नागरिक त्रस्त झाले आहेत.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रकल्पाची पाहणी करून महापालिकेला तातडीने प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली.दररोज शहरात सुमारे १३० ते १५० टन कचरा जमा होत असून त्यात ३० ते ४० टन सुका व उर्वरित ओला कचरा आहे. सध्या प्रकल्प बंद असल्याने सुमारे ७ हजार टन ताजा आणि एक लाख टन जुनाट कचरा साचलेला आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या उपायुक्तांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले.शहराध्यक्ष रवी गोंदकर यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला.वारंवार निवेदन देऊनही प्रकल्प सुरू न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले.उपायुक्तांनी येत्या दहा दिवसांत प्रकल्प सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले.मात्र मनसेने हे आश्वासन पाळले गेले नाही, तर शहरातील सर्व घंटा गाड्या महापालिकेत आणून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.या आंदोलनात रवी गोंदकर,प्रताप पाटील, राजेंद्र निकम,अविनाश देसाई, नितीन कटके,ऋषिकेश मराठे,मारुती वंजुरे, रोहित कोटकर,प्रथमेश माने,शाम येशाल तसेच आसरा नगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.