शिरोळ / प्रतिनिधी
राज्य शासनाने गुटखा,सुगंधी सुपारी,गांजा,हातभट्टीची दारू व ओल्या माव्याच्या विक्रीवर बंदी घातली असली, तरी शिरोळ शहर व परिसरात सर्रासपणे देशी दारू, गांजा, सुगंधी तंबाखू, ओला मावा विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.शिरोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतच ही बेकायदेशीर विक्री निर्भीडपणे सुरू असून,स्थानिक पोलिस प्रशासन व अन्न-औषध विभाग यांची याकडे ठळक डोळेझाक होत असल्याचे आरोप नागरिकांतून व्यक्त होत आहेत.शिरोळ शहरातील अनेक पानटपऱ्या, किराणा दुकानं तसेच हॉटेलांमध्ये विविध प्रकारचा गुटखा, तंबाखू,सुगंधी सुपारी खुलेआम विकली जात आहे.विशेष म्हणजे, शिरोळ शहरातील प्रत्येक चौकात दुकानदारांनी सुपारी आणि तंबाखू वेगवेगळ्या पुड्यांमध्ये विकण्याचा मार्ग अवलंबून गुटखाबंदी कायद्यात पळवाटा शोधल्या आहेत.सरकारने यावर बंदी आणत कठोर कारवाईचे आदेश दिले असले,तरी शिरोळ पोलिसांच्या आशीर्वादाने प्रत्यक्षात याची अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कारवाई होताना दिसत नाही.या बेकायदा व्यवसायामुळे शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुणांमध्ये गांजा,गुटखा व ओल्या माव्याचे व्यसन वाढत असून, छत्रपती संभाजी महाराज चौक, घालवाड फाटा,एसटी स्टँड चौक आधी ठिकाणी मावा सुंगधी सुपारी खरेदीसाठी तरुणाची गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळं पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.काही दुकानदार थेट प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ओला मावा भरून विकत असून,हे पदार्थ आरोग्यास अत्यंत घातक आहेत.मात्र,यावर शिरोळ पोलिस ठाण्याची ठोस कारवाई होत नसल्याने व्यवसायिकांचे फावले आहे.शासनाच्या बंदी आदेशाला धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या मावा,सुंगधी सुपारी गुटखा विक्रीमुळे तरुण पिढीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी शिरोळ पोलिस ठाण्याच्या वतीने शिरोळ शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली.मात्र ज्या मार्गावरून रॅली काढली त्याचं मार्गावर मावा, सुंगधी सुपारी, गुटखा यांची खुलेआम विक्री होत असून देखील पोलिस दुर्लक्ष का करत आहेत याचे कोडे अद्याप शिरोळकराना सुटलेले नाही. दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्याच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा देत कोल्हापूर,इचलकरंजी,कुरुंदवाड जयसिंगपूर आधी ठिकाणी कारवाई केली.मात्र शिरोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय बंद करण्यात अपयशी ठरल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. त्यामुळे स्थानिक शिरोळ पोलिस प्रशासन आणि अन्न-औषध विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे.