नुकसानग्रस्त शेतीचा शंभर टक्के पंचनामा करण्याची शेतकऱ्याची मागणी

Spread the love

पूरग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनाम्यात दुजाभावाचा आरोप;

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ येथील सोंडमळी परिसरात महापूर ओसरल्यानंतर शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर आज कृषी विभाग व महसूल प्रशासनातर्फे पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले.मात्र,पंचनाम्याच्या प्रक्रियेत मंडलाधिकारी,तलाठी व कृषी अधिकारी दुजाभाव करत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी महेश जाधव यांनी आज केला आहे.सध्या काही भागांतील ऊस हिरवागार दिसत असला तरीही त्याचे मूळ नुकसान पाण्यात राहिल्यामुळे झाले आहे.पुढील काही दिवसांत हा ऊस पूर्णतः वाळून जाईल,अशी स्पष्ट भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे अशा ऊसाचाही संपूर्ण नुकसानग्रस्त म्हणून पंचनामा व्हावा, अशी मागणी केली जात आहे.आज सोंडमळी परिसरात पंचनाम्यासाठी कृषी अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. पुरामुळे शेतातील पिके सडली असून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.काही ठिकाणी मातीही वाहून गेली आहे.मात्र, काही अधिकाऱ्यांकडून या नुकसानीकडे दुर्लक्ष केले जात असून निवडक शेतीचाच पंचनामा केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.पूरग्रस्त शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असताना प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांचा शंभर टक्के पंचनामा करून त्वरित मदत जाहीर करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!