आम.यड्रावकर यांच्या जयसिंगपूर शहरात सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे 

Spread the love

जयसिंगपूर | प्रतिनिधी

‘स्वच्छ भारत’ मोहिमेचे फलक झळकले असले तरी जयसिंगपूर शहरात स्वच्छतेच्या कामात खऱ्या अर्थाने झगडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे.शहरातील नागरिक सोशल मीडियावर स्वच्छतेबाबत आवाज उठवत असले तरी प्रत्यक्षात सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य,सुरक्षेची संपूर्णपणे अवहेलना केली जात आहे.

 

आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या ताब्यात असलेल्या जयसिंगपूर पालिकेच्या मालकीच्या अनेक घंटागाड्या आणि कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली धोकादायक अवस्थेत शहरात फिरत आहेत.एका ट्रॉलीचे चाकच अनेक दिवसांपूर्वी गायब झाले असून, ती अजूनही शहरभर फिरते आहे.काही गाड्या तर सुरू करण्यासाठी धक्का मारावा लागतो. इंजिन,बॅटरी प्रणाली निकामी झाल्यामुळे कर्मचारी प्रचंड त्रास सहन करत आहेत.

 

यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे ना मास्क आहेत,ना हँडग्लोव्हज.सडलेला कचरा उचलताना हे कर्मचारी तोंडावर रुमाल बांधून काम करतात.डेंग्यू,मलेरिया आणि त्वचारोगांचा धोका सतत असतो.वैद्यकीय सुविधा तर दूरच, या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीही केली जात नाही.पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष इतके टोकाचे आहे की वेळेवर वाहनांची देखभालही केली जात नाही.त्यामुळे हे कर्मचारी जीव धोक्यात घालून शहराची स्वच्छता राखत आहेत.जर लवकरात लवकर सर्व वाहनांची दुरुस्ती, कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा,सुरक्षा साधनं, विमा आणि नव्या उपकरणांची खरेदी केली नाही, तर नागरिक आणि सफाई कर्मचारी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

 

 

स्वच्छतेचे खरे शिल्पकार असलेल्या कर्मचाऱ्यांचे जीवन हे इतकं दुर्लक्षित राहणं — ही संपूर्ण शहरासाठी शरमेची बाब नाही का?”

Leave a Comment

error: Content is protected !!