शिक्षकांचा आयकर गैरव्यवस्थापनाचा मुद्दा पेटला; आंदोलनाचा इशारा

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात त्यांच्या मुख्याध्यापकांमार्फत गटशिक्षणाधिकारी, हातकणंगले यांच्या टॅन खात्यावर आयकराची रक्कम नियमितपणे जमा करूनही पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ती रक्कम आयकर खात्याकडे वर्ग न केल्याने अनेक शिक्षकांना व्याज व दंडासह ई-मेल नोटीसा प्राप्त झाल्या आहेत.यामुळे प्रामाणिकपणे कर भरलेल्या सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, सदर प्रकरणी शिक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.या गंभीर समस्येची शिक्षक समितीने वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदनांद्वारे व पाठपुराव्याद्वारे दखल घेण्याची विनंती केली होती. मात्र प्रत्येकवेळी प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने न घेता दुर्लक्ष केल्याने आज शिक्षक न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत. चुकीच्या प्रशासनिक निर्णयामुळे शिक्षण विभाग जबाबदारी झटकत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर शिक्षक समिती हातकणंगलेने प्रशासनाकडे हा प्रश्न तात्काळ सोडवण्याची आग्रही मागणी केली असून, अन्यथा कायदेशीर मार्गांचा अवलंब करून पंचायत समिती व जिल्हा परिषद कोल्हापूर समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.या वेळी शिक्षक समितीचे अर्जुन पाटील, संजय कुंभार, मारुती पाटील, सचिन कोल्हापुरे, संजय मोरे, भीमराव पाटील, बालाजी पांढरे, राजीव कोरे, सागर पाटील, विनायक तावरे, महादेव गायकवाड, प्रकाश धातूंडे, लक्ष्मण जाधव, अनिल गायकवाड, संदीप कांबळे, अशोक जाधव, गणपती पाटील, अनिल पवार, नामदेव बनकर, विजयकुमार प्रज्ञावंत यांसह अनेक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!