विजेच्या धक्क्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू पुलाची शिरोलीत गावात शोककळा

Spread the love

पुलाची शिरोली कुबेर हंकारे 

पुलाची शिरोली येथे सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.नवविवाहित आणि मेहनती स्वभावाच्या नवज्योत महादेव मोंगले वय २२,रा.शिरोली माळवाडी याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या या तरुणाच्या अकाली निधनाने गावात शोककळा पसरली आहे.नवज्योत हा आज सोमवार दिनांक 28 जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास आपल्या शेतातून जनावरांसाठी वैरण आणून घरी आला होता.त्यानंतर नेहमीप्रमाणे दूध संस्थेत दूध जमा करून तो परत आपल्या घरी गेला.घराजवळ असलेल्या ‘ज्योतिर्लिंग सर्व्हिसिंग सेंटर’मध्ये हातपाय धुण्यासाठी त्याने पाण्याची मोटार सुरू केली.दुर्दैवाने त्याच वेळी मोटारीत तांत्रिक बिघाड झाल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला.घटनास्थळीच तो कोसळला आणि काही क्षणांतच त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांसह शेजारी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत नवज्योतची प्राणज्योत मालवली होती.त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले,मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपासासाठी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.नवज्योत हा अत्यंत कष्टाळू, मनमिळावू आणि सर्वांशी आपुलकीने वागणारा तरुण होता. त्याचे वागणे सर्वांमध्ये लोकप्रिय होते. नुकतेच त्याचे लग्न झाले होते, त्यामुळे मोंगले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण शिरोली माळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.”

error: Content is protected !!