हातकणंगले / प्रतिनिधी
कसबा आळते येथील जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बाळासाहेब पाटील दादा हायस्कूल,आळते येथे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील “The Story of Tea” या धड्याच्या अनुषंगाने एक आगळावेगळा उपक्रम राबवत टी सेरेमनीचे आयोजन केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या विविध प्रकारच्या चहा व कॉफीचे सादरीकरण केले. यामध्ये ब्लॅक टी, लेमन टी, कोल्ड कॉफी, ब्लू टी, हर्बल टी, जॅगरी टी, मसाला टी, ब्लॅक कॉफी, काढा, रोझ टी इत्यादी अनेक चविष्ट व आरोग्यदायी पेयांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी हा उपक्रम फक्त अभ्यासापुरता न ठेवता त्यातून संवाद कौशल्य, सादरीकरण, व प्रात्यक्षिक शिक्षण यावर भर दिला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इंग्रजी अध्यापिका सौ. टारे एस.एम. यांनी केले. विद्यार्थिनी वंशिका पाटील हिने आपले मनोगत व्यक्त करत टी सेरेमनी मागील शैक्षणिक उद्देश स्पष्ट केला. या वेळी पत्रकार सुकुमार अब्दागिरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन संजयकुमार पाटील, व्हा. चेअरमन दादासो चौगुले, संचालक बबन चौगुले, जिनगोंडा पाटील, महावीर टारे, अजित मजलेकर तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम व सर्व शिक्षकवृंद कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. शिखरे सर व पर्यवेक्षक श्री. केंगळे सर यांनी मार्गदर्शन केले. इंग्रजी विभाग प्रमुख श्री. साळुंखे सर, माजगावकर सर यांच्यासह संपूर्ण टीमच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.