ज्युनिअर विभागात शांभवी तर सीनिअर विभागात प्रज्ञा माळकर प्रथम
शिरोळ / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री डॉ.अण्णासाहेब डांगे यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत ज्युनिअर गटात कु. शांभवी श्रीकांत माळकर हिने तर सीनिअर गटात कु. प्रज्ञा श्रीकांत माळकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक ,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री.ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या डॉ. अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेज आष्टा जिल्हा सांगली येथील शैक्षणिक संकुलाच्या भव्य सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धेत ज्युनिअर व सीनिअर गटात मिळून राज्यातील विविध महाविद्यालयाच्या तब्बल ८५ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेत ज्युनिअर गटात बोलताना कु. शांभवी हिने ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर – आदर्श प्रशासक व राज्यकर्त्या ” या विषयावर तर कु. प्रज्ञा हिने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक व धार्मिक कार्य ” या विषयावर आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडून खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रोत्यांची मने जिंकली.कु.शांभवी ही शिरोळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.पद्माराजे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्सची विद्यार्थिनी असून कु.प्रज्ञा ही सांगली येथील श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.दोन्हीही भगिनींना त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.