कुंभोज / प्रतिनिधी
हातकणंगले पंचायत समितीच्या वतीने कुंभोज येथील रयत माऊली सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 सन 2024-25 अंतर्गत लाभार्थी मेळावा,महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण,मंजूर आदेश व पूर्ण घरकुल प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात 8 लाभार्थ्यांना मंजूर आदेश तसेच पूर्ण घरकुल प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी होत्या.त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देत शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांवर भर दिला.
यावेळी कुंभोज गावच्या सरपंच सौ. राजश्री महापुरे, सरपंच सुलोचना कट्टी, कटारे साहेब, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत शासनाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. योजना पारदर्शकतेने आणि वेळेत राबवली जात असल्याने ग्रामीण भागातील गरीब,गरजू कुटुंबांना आपले हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मंजुरीचे आदेश व पूर्ण झालेल्या घरकुलांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केले.