नृसिंहवाडी / प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीनजी गडकरी यांचे सुपुत्र निखिल नितीन गडकरी, सुनबाई सौ. ऋतुजा निखिल गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नुकतीच श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त महाराजांच्या पावन पादुकांचे दर्शन घेतले. विशेष बाब म्हणजे या संपूर्ण भेटीदरम्यान कोणतीही शासकीय यंत्रणा,पोलिस बंदोबस्त अथवा गाजावाजा नव्हता. सर्वसामान्य भाविक ज्या पद्धतीने दत्त चरणी लीन होतात,त्याच पद्धतीने गडकरी कुटुंबाने साधेपणाने दर्शन घेतले.या त्यांच्या नम्र,सुसंस्कृत आणि भाविकतेने परिपूर्ण वागणुकीबद्दल संपूर्ण परिसरात आणि जिल्ह्यात चांगलेच कौतुक होत आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत असतात.मात्र, कोणत्याही प्रकारचा विशेष बंदोबस्त न ठेवता सर्वसामान्य भाविकांप्रमाणे दर्शन घेणे ही अत्यंत वाखाणण्याजोगी बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.निखिल गडकरी व ऋतुजा गडकरी यांनी भाविकांची गैरसोय होऊ नये,याकडे विशेष लक्ष दिले.त्यांच्या या सुसंस्कृत वर्तनामुळे इतर नेत्यांच्या कुटुंबांनी देखील या प्रकारातून प्रेरणा घ्यावी, अशी चर्चा सध्या स्थानिक पातळीवर होत आहे. सत्ताधारी अथवा मोठ्या पदावरील लोकांनी जर अशा प्रकारे साधेपणाने दर्शन घेतले, तर कोणत्याही धार्मिक स्थळी भाविकांवर ताण येणार नाही, याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले आहे.गडकरी कुटुंबीयांचा हा नम्र आणि भक्तिपूर्वक भेटीचा उपक्रम हे एक सकारात्मक उदाहरण असून, ‘दत्त चरणी अशीच नम्रता सर्वांकडून यावी’, अशी प्रार्थना अनेक दत्तभक्त करत आहेत.