मुलांचे व्यक्तिमत्व घडवताना पालकांची सजगता महत्वाची – ॲड.श्रीकांत माळकर

Spread the love

चिंचवाड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

शिरोळ / प्रतिनिधी

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असून त्यांची जडणघडण करताना पालकांनी सदैव सजग राहिले पाहिजे. मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास ही केवळ शाळा व शिक्षकांची जबाबदारी नसून ती पालकांची सुद्धा जबाबदारी आहे. आजचा विद्यार्थी मोबाईल व सोशल मीडियाच्या आहारी गेला असून, त्याचा परिणाम त्याच्या बौद्धिक व मानसिक विकासावर होत आहे. विद्यार्थ्यांना थोर पुरुषांची व संत , शास्त्रज्ञ, समाजसेवक आदिंची प्रेरणादायी पुस्तके वाचण्यास प्रवृत्त केले पाहिजे. त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजविणे ही काळाची गरज आहे.

 

 

जर आपल्या मुलांमध्ये पालकांनी आत्मविश्वास निर्माण केला तर ते जग जिंकू शकतात एवढी ताकद व आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असतो. यासाठी मुलांच्या पंखाना बळ व सामर्थ्य देणे गरजेचे आहे ,असे मत व्हिजन आयडॉल्स करिअर अकॅडमीचे संचालक ॲड. श्रीकांत माळकर यांनी व्यक्त केले.

 

चिंचवाड ता. शिरोळ येथील श्री.विठ्ठल मंदिर व्यवस्थापन समितीच्यावतीने आयोजित गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात- ” मुलांचा व्यक्तिमत्व विकास व करिअरच्या दिशा “या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भगवानराव घाटगे विकास सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आदित्य घाटगे होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धा परीक्षा मध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

याप्रसंगी बोलताना युवावक्त्या प्रज्ञा माळकर म्हणाल्या , ” आज मोबाईल व सोशल मीडिया हे नव्या पिढीसमोरील सर्वात मोठं आव्हान बनलं असून टीव्ही वरच्या भन्नाट मालिका घरोघरी सुरू आहेत. यामुळे कुटुंबातील संवाद हरवत चालला असून नात्यातील ओलावाही संपत चालला आहे

 

 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन वआभार माजी ग्रामपंचायत सदस्य परमानंद उदगावे यांनी मानले. यावेळी सरपंच जालिंदर ठोमके,उपसरपंच विठ्ठल गोधडे , सदस्य संजय चौगुले , पोलिस पाटील सरदार चव्हाण , केशव घाटगे ,महादेव घाटगे , भरत पाटोळे ,मेजर प्रा. के.एम.भोसले , माजी प्राचार्य एस. एस. पाटील ,मुख्याध्यापक मच्छिंद्र जाधव , मकरंद जाधव , हेमंत तेलवेकर ,विविध शाळामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक ,ग्रामस्थ व विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!