शिरोळ पाणी योजनेतील घोटाळ्याप्रकरणी आंदोलन अंकुशचे बेमुदत उपोषण

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ शहरासाठी २६ कोटीची नळ पाणी पुरवठा योजना उभारली जात आहे. या योजनेतील अंतर्गत पाईप लाईनला पाणी पुरवठा अधिकारी, कर्मचारी, आणि ठेकेदार यांनी संगनमताने १७०० रुपये घेऊन परस्पर नळ कनेक्शन देऊन सुमारे २० ते २५ लाख घोटाळा केला आहे. त्यामुळे जबाबदार कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या मागणीसाठी आंदोलन अंकुशचे शिरोळ शहराध्यक्ष अक्षय पाटील यांनी सोमवारपासून नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.
शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या पालिकेच्या दोन लिपिकांवर निलंबणाची कारवाई झाली आहे. मात्र या घोटाळ्यात सामील असणारे पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता, लेखापाल यांच्यावर कारवाई झालेली नाही.त्याचबरोबर या घोटाळ्यातील २ लाख रुपये जमा केले असले तरी अजून मोठी रक्कम वसुल झालेली नाही. घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे याची पोलीस चौकशी झाली पाहिजे.गावातील बऱ्याच लोकांनी पाणी पुरवठा विभागातील लोकांच्याकडे विश्वासाने पैसे दिले आहेत. त्यांची फसगत होऊ नये याकरिता नगरपरिषद अधिकारी आणि तक्रारदार संघटना यांची संयुक्त समिती नेमून या घोटाळ्याची सखोल चौकशी करायला पाहिजे. लोकशाहीमध्ये जनता मालक आहे आणि त्याच जनतेला लुटायला चालू झाल्यास काळ सोकावून लोकशाही धोक्यात येईल म्हणून या भ्रष्टाचार करणाऱ्या सगळ्या साखळीवर कारवाई होणे गरजेचे असल्यामुळे आंदोलन अंकुशने उपोषणाचे हत्यार उपसले आहे.यावेळी बोलताना अक्षय पाटील म्हणाले की शिरोळच्या पाणी योजनेत कर्मचारी अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने परस्पर नवीन नळ कनेक्शन देऊन सुमारे २० ते २५ लाख रुपयाचा अपहर केला आहे. याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले असले तरी जबाबदार पाणीपुरवठा अभियंता आणि लेखपाल यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच पोलिसात गुन्हा दाखल होऊन घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे याकरिता माझे उपोषण सुरू झाले आहे.यावेळी आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे, सोमनाथ तेली, महेश जाधव, अमोल गावडे, पोपट राणे संकपाळ, दीपक कोळी चंद्रशेखर माळी अण्णासो कदम यांच्यासह आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!