दत्तवाड / प्रतिनिधी
सैनिक टाकळी येथील संभाजीनगर मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या कु.मधुरा अमोल वडर या विद्यार्थिनीने नुकत्याच झालेल्या डी.के.टी.ई.प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता.घरची गरिबीची परिस्थिती असल्यामुळे ही विद्यार्थिनी सैनिक टाकळी येथील आजोळी म्हणजे आजीच्या घरी राहते.आजीचीही परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये ही विद्यार्थिनी शिक्षण घेते.अभ्यासात हुशार असणाऱ्या या विद्यार्थिनीला इतर विद्यार्थ्यांच्या प्रमाणे चांगले कपडे मिळत नाहीत.वह्या पुस्तकं मिळत नाहीत.इतर मुलांच्या प्रमाणे हौसमौज करता येत नाही.तिची ही दैन्यावस्था पाहून सैनिक टाकळी येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य महादेव पाटील व त्यांच्या पत्नी सौ.संध्या पाटील यांनी सामाजिक व मानवतेच्या दृष्टीकोनातून सदर विद्यार्थिनीला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला.आर्थिक मदतीसह शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.एवढेच नव्हे तर इथून पुढच्या काळात शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.पाटील परिवाराच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे.