कुरुंदवाड / प्रतिनिधी
कर्नाटकातील सौंदत्ती येथून सुरू झालेली आदिमाया यल्लम्मा देवीची ऐतिहासिक रथयात्रा शिरोळ तालुक्यात दाखल होताच भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने तिचे स्वागत केले.गुरुवारी रात्री हेरवाड येथे झालेल्या जागरण सोहळ्याने वातावरण भक्तिमय झाले.देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली, तर ग्रामस्थांनी महाप्रसादाचे भव्य आयोजन केले होते.धर्मजागरण ट्रस्ट श्री रेणुका माता संस्थेच्या वतीने ही रथयात्रा पारंपरिक रीतीरिवाज आणि श्रद्धेने कर्नाटकातील सौंदत्ती येथून सुरू झाली.यल्लम्मा देवी हे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भक्तांसाठी विशेष पूजनीय स्थळ आहे.600 वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेली ही रथयात्रा भाविकांसाठी ऐतिहासिक पर्वणी ठरली आहे.रथयात्रेच्या आगमनावेळी ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत, मंगल वाद्यांच्या गजरात देवीचे भव्य स्वागत केले.हेरवाड येथील जागरण सोहळ्यात भाविकांनी भजन, गोंधळ, कीर्तन, आणि धार्मिक प्रवचनांमध्ये सहभागी होत भक्तीचा जिवंत अनुभव घेतला. रात्रभर चाललेल्या या सोहळ्यात गावाच्या कानाकोपऱ्यात भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले. देवीच्या रथासाठी मार्ग फुलांनी सजवण्यात आला होता. रथ आगमनानंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या, तर काहींनी नवस पूर्ण करण्यासाठी रथ ओढण्याचा मान मिळवला.यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिभावाने न्हाले.या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अनेकांनी नवस फेडण्यासाठी रथ ओढण्याचा मान मिळवला. देवीचे दर्शन घेतल्याने नवस पूर्ण झाल्याचा आनंद अनेकांनी व्यक्त केला. रथयात्रा केवळ धार्मिक परंपरेचे प्रतीक नसून, ती सामाजिक एकात्मतेचा आदर्शही ठरत असल्याचे भाविकांनी सांगितले.शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांनी देवीच्या स्वागतासाठी केलेल्या भव्य तयारीचे कौतुक होत असून, हेरवाड येथे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती.यल्लम्मा देवीची रथयात्रा भाविकांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा अनोखा संगम ठरली आहे.