शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तहसील कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर माती वाहतूक सुरु असल्याच्या प्रकरणी स्थानिक नागरिकातुन तक्रारी येत होत्या मात्र या माती वाहतुकीला महसूल प्रशासनाची साथ असल्याने हा गोरस धंदा राजरोसपणे सुरु आरोप नागरिकातून व्यक्त केला जात आहे.दररोज शिरोळ तहसील कार्यालयासमोर मातीने भरलेली अनेक वाहने जात असतात,जेव्हा वाहतूक परवाना पावती मागितली,तेव्हा या वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडे २५ डिसेंबर तारखेची पावती होती,तर मातीची वाहतूक २६ डिसेंबर तारखेला सुरू होती.यावरून माती वाहतूक करणारी वाहने रॉयल्टी चुकवून लाखो रुपयांचा महसूल बुडवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.यावर तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी कडक कारवाई करून माती माफियांची हुकूमशाही मोडून काढावी अशी माफक मागणी केली जात आहे.माती माफिया शासनाचा महसूल बुडवत असल्याने यावर वचक रहावी म्हणून आज आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार विलास भिसे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,आज रॉयल्टी बुडवून माती वाहतूक करणाऱ्या चार मोठी वाहने एकाच वेळी माती भरून जात होती आणि त्यांचे कडील रॉयल्टी पावती खोटी होती.या वाहने बेकायदेशीरपणे माती चोरून आणि परवाना न घेता वाहतूक करत आहेत.याबाबत तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि सर्व वाहने परत बोलावून कारवाई केली जावी,अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.तसेच,या माती उत्खनननामुळे परिसरातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे तहसीलदार व महसूल प्रशासनाने तात्काळ कारवाई केली तर माती चोरीला वचक बसणार आहे असा विश्वास व्यक्त केला.याबाबत महसुल प्रशासन कारवाई करणार का? याकडे शिरोळ तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.