श्री दत्त कारखान्याच्या प्रयत्नामुळे क्षारपड जमीन  लाभार्थीच्या खात्यात प्रति हेक्टरी 60 हजार रुपये वर्ग

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सादर केलेल्या, शिरोळ तालुक्यातील सात क्षारपड जमीन सुधारणा संस्थेमार्फत 1545 हेक्टर क्षेत्रावर क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबवण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती. यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेडशाळ, अर्जुनवाड, कवठेसार, गणेशवाडी, कुटवाड, हसूर, घालवाड या गावांमध्ये सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर करून क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रम राबविण्याकरिता 9 कोटी 45 लाख 54 हजाराचा निधी उपलब्ध करून दिला होता. यापैकी प्रकल्पांतर्गत 80 लाखाचा निधी प्रति हेक्टरी 60 हजार रुपये प्रमाणे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात आला असल्याची माहिती, श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री दत्त साखर कारखान्याच्या मार्फत 2016 पासून शिरोळ व परिसरातील क्षारपड जमीन सुधारणा करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. क्षारपड मुक्ती संदर्भात शेतकऱ्यांच्या बैठका घेणे, जनजागृती करणे, त्यांना एकत्रित करून संस्था स्थापन करणे, तसेच बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे, यासाठी स्वतः पुढाकार घेऊन काम करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून आतापर्यंत तालुका व परिसरातील 10000 एकरावर क्षारपड मुक्तीचे काम झाले असून 4000 एकरावर प्रत्यक्षात शेतकरी उत्पादन घेत आहेत.
या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत, अनुदान मिळविण्यासाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मृद व जलसंधारण विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. यामध्ये शिरोळ तालुक्यातील एकूण दहा हजार हेक्टर पाणथळ क्षारपड जमिनीपैकी शेडशाळ, गणेशवाडी, अर्जुनवाड, कवठेसार, घालवाड, बुबनाळ, औरवाड, कुटवाड, हसूर या गावांमध्ये सच्छिद्र निचरा प्रणाली द्वारे सुमारे 1910 हेक्टर क्षारपड जमीन सुधारणा करणे बाबत 59 कोटी 45 लाख प्रकल्प किमतीचा प्रस्ताव सादर केला होता. यास राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीने केंद्र शासनाची मंजुरी घेण्याच्या अटीच्या अधीन राहून मंजुरी दिली होती. त्यानुसार दि. 29 जुलै 2021 रोजी केंद्र शासनास सदर प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला होता. केंद्र शासनाने दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये सन 2018-19 मधील राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या उप योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 2 कोटी 19 लाखाचा निधी (यामध्ये केंद्र हिस्सा एक कोटी 32 लाख आणि राज्य हिस्सा 87 लाख रुपये) प्रकल्पासाठी देण्यात आला होता.या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी स्वनिधीतून प्रक्षेत्र विकास, बांध बंधिस्ती, पाण्याचा पाट, जमिनीस आकार देणे, भूसुधारक, हिरवळीची खते, उसाचे बेणे, खते व औषधे आदींचा खर्च करायचा आहे तर सच्छिद्र निचरा प्रणालीसाठी प्रति हेक्टरी 60 हजार रुपये अर्थसहाय्य शेतकऱ्यांना मिळाले आहे.गणपतराव पाटील यासंदर्भात बोलताना म्हणाले, श्री दत्त कारखान्याच्या वतीने करण्यात येत असलेल्या क्षारपड मुक्तीच्या ‘श्री दत्त पॅटर्न’ची आणि शिरोळ आणि परिसरात सुरू असलेल्या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची शासनाने दखल घेऊन देशपातळीवरचा नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून इतका मोठा निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन सुधारण्यासाठी स्वखर्चातून तसेच कर्ज काढून सच्छिद्र निचरा प्रणाली योजना राबवली होती व राबवित आहेत. शासनाकडून या मिळालेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. तसेच शिल्लक असलेल्या क्षारपड जमीन सुधारण्यासाठीही शेतकऱ्यांना नवे बळ मिळून शिरोळ तालुका आणि परिसर क्षारपडमुक्त नक्कीच होईल अशी आशा वाटते. या प्रकल्पासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.

error: Content is protected !!