5 लाखाची खंडणी मागणार्‍या जर्मनी टोळीतील चौघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा

Spread the love
इचलकरंजी / प्रतिनिधी 
रुकडी येथील कापड व्यावसायिक धनाजी राजाराम खुडे वय 34 यांना जीवे मारण्याची धमकी देत 78 हजाराचे मोबाईल हिसकावून घेऊन दरमहा 5 लाखाची खंडणी मागणार्‍या जर्मनी टोळीतील चौघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा

दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये आनंदा शेखर जाधव (जर्मनी), प्रविण मगदूम (कन्नड पव्या), अक्षय कोंडुगळे व एक अनोळखी अशा चौघांचा समावेश आहे. यापैकी प्रविण मगदूम याला अटक करण्यात आली आहे.विशेष म्हणजे फिर्यादी हा सुध्दा जर्मनी टोळीचाच सदस्य असून अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास प्रविण मगदूम याने कबनूर येथून फिर्यादी धनाजी खुडे याला आनंदा जर्मनीने बोलविल्याचे सांगत शंभुराजे कॉर्नर येथील एका टॅटुच्या दुकानात नेले. त्याठिकाणी आनंदा जर्मनी याने खुडे याच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली.त्याला खुडे याने नकार दिल्याने त्याला जबरदस्तीने त्याच्याच चारचाकी (क्र. एमएच 09 जीएम 6040) वाहनातून आनंदा व प्रविण यांनी सोन्या मारुती चौक येथे नेत असताना खुडे याच्याकडील 78 हजाराचे दोन मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले.सोन्या मारुती चौक येथे आल्यानंतर अक्षय कोंडुगळे याने त्याच्याकडे 5 लाखाची मागणी केली.त्यावेळी खुडे याने नकार दिल्याने कोंडुगळे व अनोळखी व्यक्तीने त्यास शिवीगाळ करत कानशिलात लगावली.तर आनंदा जर्मनी याने चाकू काढ, याला कर्नाटकात नेऊन भोसकुन टाकुया, उचलून आणल्याचे कोणी पाहिले नाही, त्यामुळे काही विषय नाही असे सांगितले.त्यावर कोंडुगळे हा चाकू काढत असतानाच खुडे याना प्रसंगावधान राखत गाडीचा दरवाजा उघडत व चावी घेऊन पलायन केले.संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.पण खुडे बचावला.या प्रकरणी खुडे याने दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापैकी प्रविण मगदूम याला अटक करण्यात आली असून अन्य तिघांचा शोध सुरु असल्याचे पोलिस निरिक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.सर्वच संशयित आरोपी हे सराईत व पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

error: Content is protected !!