शिरोळ / प्रतिनिधी
ऊस दराबाबत आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने मंगळवारी शिरोळ तहसील कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील साखर कारखानदारांचे कार्यकारी संचालक व शेती अधिकारी उपस्थित होते.त्या बैठकीदरम्यान आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने ऊस उत्पादनातून साखर कारखानदारांना झालेला नफा व दिवस रात्र राबणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारा दर यामधील फरक समजावून सांगत होते.मात्र या बैठकीला आलेले शिरोळ दत्त सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील व मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाणा या बैठकीत मोबाईलवर रिल्स बघण्यात मग्न होते.त्यांचा हा व्हिडिओ आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने आज व्हायरल केला आहे.त्यामुळे साखर कारखानदारांना शेतकऱ्यांच्याबद्दल सहानुभूती नाही असे दिसून येत असल्याचा आरोप आंदोलन अंकुश संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांनी आज शिरोळ येथे बोलताना व्यक्त केला आहे.कार्यकारी संचालक व शेती अधिकारी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शिरोळ तालुक्यासह कर्नाटकातील शेतकऱ्यांच्यात संतापाची लाट पसरली असून त्यांच्या या कृती बद्दल सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे.याबाबत कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील व शेती अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.