उदगाव / प्रतिनिधी
लग्नाचे रिसेप्शन करून सांगली येथे घरी परत येत असताना वाहनचालक प्रसाद खेडेकर यांना झोपेचा डुलका लागल्याने चारचाकी वाहनाचा ताबा सुटून उदगांव (ता.शिरोळ) येथे कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चारचाकी वाहन 130 फूट उंचीवरून नदीपात्रात कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.या अपघातात पती प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय 40) व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर (वय 36 दोघे रा. मारुती रोड, गावभाग, सांगली) व वैष्णवी संतोष नार्वेकर (वय 21 रा.आकाशवाणी केंद्रजवळ सांगली) हे तिघे जागीच ठार झाल्याची घटना घडली.तर वरद संतोष नार्वेकर, साक्षी संतोष नार्वेकर (दोघे रा.मल्हार निवास, गंगाधर गुरुकृपा कॉलनी सांगली) व समरजीत प्रसाद खेडेकर (वय 7, रा.मारुती रोड, गावभाग, सांगली) हे तिघे गंभीर जखमी झाले असून या तिघांवर सांगली येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघाताने शिरोळ तालुक्यासह सांगली शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या अपघातप्रश्नी मयत वाहनचालक प्रसाद खेडेकर यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांत मिळालेली अधिक माहिती अशी,प्रसाद खेडेकर यांच्या नातेवाईकांचे मंगळवारी कोल्हापूर येथे लग्न समारंभासाठी हे सर्व कुटुंबिय गेले होते.बुधवारी हॉटेल पॅव्हेलियन येथे लग्नाचे रिसेप्शन रात्री 11.30 च्या सुमारास संपले.त्यानंतर चारचाकी वाहन प्रसाद खेडेकर हे चालवत होते. त्यांच्याबरोबर पत्नी प्रेरणा खेडेकर, वैष्णवी नार्वेकर,वरद नार्वेकर,साक्षी नार्वेकर व समरजीत खेडेकर असे सहाजण ते सांगलीकडे परत यायला निघाले.मध्यरात्री 1 च्या सुमारास उदगांव येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलाच्या जवळ आल्यानंतर वाहनचालक प्रसाद खेडेकर यांना झोपेचा डुलका आला व गाडीचा ताबा सुटून पुलावरुन खाली कोसळली.या गाडी पाठीमागे सांगलीकडे जाणार्या एका युवकाने चारचाकी वाहन पुलावरून खाली पडल्याची माहिती उदगांव चेकपोस्टवर असलेल्या पोलिसांना दिली.घटनास्थळी पोलिस निरिक्षक सत्यवान हाके यांच्यासह पोलिस, उदगांव व जयसिंगपूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली. रात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याने सर्वांचीच भांबेरी उडाली. पोलिस व कार्यकर्त्यांनी चेंदामेंदा झालेल्या गाडीचे दरवाजे उघडून व मागील काचेतून सर्वांना बाहेर काढून तातडीने शासकीय रूग्णवाहिकेतून सांगली सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.यावेळी प्रसाद खेडेकर, प्रेरणा खेडेकर हे पती पत्नी व वैष्णवी नार्वेकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचबरोबर इतर जखमींवर सांगली येथील दोन खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद जखमी वरद संतोष नार्वेकर यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. घटनास्थळी दुपारपर्यंत बघ्यांनी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलिस निरिक्षक सत्यवान हाके, अप्पर पोलिस अधिक्षक नितेश खाटमोडे-पाटील यांनी पाहणी केली.
【चौकट】
उदगांव येथे जुन्या पुलाला 2018 मध्ये ट्रकने धडक दिल्याने संरक्षण कठडा कोसळला आहे. त्यानंतर 2018 मध्ये चारचाकी वाहन थेट या संरक्षण कठड्यावर जाऊन अंतराळी राहिले होते. तर जानेवारी महिन्यात अशाच पध्दतीने एक कार खाली कोसळली होती. या कारमधील एअर बॅग निघाल्याने दोघांचा जीव वाचला होता. बुधवारी मध्यरात्री याच ठिकाणी चारचाकी वाहन पुलावरून खाली कोसळून तिघांचा जीव गेला.