शिरोळ / चंद्रकांत भाट
कार्तिक पौर्णिमेनंतर येणार्या पहिल्या मंगळवारी शिरोळ येथे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराजांचा उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरुस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. सर्वधर्मियांचे लोक मोठ्या भक्तीभावाने बुवाफन महाराजांच्या दर्शनासाठी एकत्र येतात.महाराजांना नवसाचे गलेफ, नारळाची तोरणे अर्पण केली जातात. लिंगायत मठपती हिरेमठ स्वामीच्याकडे पुजेचा मान असतो. मोठ्या प्रमाणात फकीरही येथे हजेरी लावतात. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा उत्सव व उरूस ओळखला जातो. सोमवारी सकाळी श्री बुवाफन महाराज मंदिरातील समाधीस्थळी अभिषेक व पूजा करण्यात आली रात्री सर्व मानकरी आणि भक्तगणांच्या उपस्थितीत श्री बुवाफन महाराजयांच्या समाधीस्थळी गंधरात्र सोहळा संपन्न झाला.आज मंगळवार श्री बुवाफन महाराज उत्सवाचा मुख्य दिवस.बुवाफन महाराजांच्या जन्माबद्दल अशी अख्यायिका सांगितली जाते की, त्यांचा जन्म शिरोळ पंचक्रोशीत झाला.त्यांची आई शिरोळमधील खानदानी मुसलमान घराण्यातील.पण,लहानपणापासून या मुलीला शंकराच्या भक्तीचे जणू वेडच लागले होते. इतर हिंदू मुली-स्त्रियां बरोबर ती मुलगी बेल-फुले घेऊन नियमितपणे कल्लेश्वरच्या देवळात जाऊ लागली. वय वाढेल तशी तिची भक्ती वाढतच गेली. सोमवारचा उपवास शिवरात्रीचे व्रत, ध्यान, धारणा यामुळे तिच्या घरातील लोक चिंतीत झाले.जमातीतले लोक त्यांना तंबी देऊ लागले. या मुलीला सुरूवातीला सामोपचाराने नंतर रागावून सांगून पाहिले तरी हिची भक्ती कमी न होता उलट जास्तच झाली. झोपेतसुद्धा ‘ॐ नम: शिवाय’ चा जप सुरू असायचा. यावर तोडगा म्हणून तिचे लग्न (शादी) लवकरात लवकर करायचे तिच्या घरच्यांनी ठरविले. वराची शोधाशोध सुरू झाली आणि मालगाव (ता. मिरज) येथील एक चांगला मुलगा पसंत करून या मुलीचा निकाह लावला.मालगावात ही मुलगी सुरूवातीला मोठ्या सुखात नांदत होती. हळूहळू सासुरवाडीची माहिती मिळवत तिने तेथील शिवमंदिर पाहून घेतले आणि सर्वांचा डोळा चुकवून ही शंकराचे दर्शन घेऊन आली! मग अधून-मधून कामातून सवड काढून ती शिवालयात जाऊ लागली. तिचे हे चमत्कारीक वर्तन हिंदू आणि मुसलमान जमातीला आवडले नाही. तिच्या घरी वादावादी झाली. सासरची मंडळी खूप चिडले. शेवटी त्यांनी तिला शिरोळमध्ये तिच्या आई-वडिलांच्या घरात आणून सोडले. तिच्या आई-वडिलांनाही तिचा राग आला. त्यांना तो आपल्या खानदानाचा अपमान वाटला. रागाच्या भरात त्यांनीही तिला घराबाहेर काढले.रडत-रडत ती कल्लेश्वर देवळात गेली. शंकराचे दर्शन घेतले आणि मनाचा निर्धार करून ती पाय नेतील तिकडे चालत राहिली. शिरटी ते नृसिंहवाडी दरम्यानचा कृष्णा नदीचा काठ तेव्हा घनदाट झाडी-वेलीने दाटलेला ‘मोळ्याचे टेक’ या नावाने ओळखला जात होता. याठिकाणी काही साधक एकांतात साधना करीत असत. प्रसिद्ध शुक्लतिर्थ याच काठावर आहे. अशा ठिकाणी सासर आणि माहेर तुटलेल्या या मुलीने विचाराच्या तंद्रीत मोळ्याचे टेक केव्हा गाठले हे तिलाही कळाले नाही. थकून-भागून ती एका झाडाखाली बसली. दिवसभर झालेल्या दगदगीने तिला केव्हा झोप लागली हे समजले नाही. सकाळी जाग आल्यावर पक्षांचा मंजूळ कलकलाट, लयीत उड्या मारत जाणारे हरणांचे कळप, कृष्णा नदीचा खळखळता प्रवाह, चैतन्याने नटलेली वनश्री पाहून तिला खूप आनंद झाला. इतक्यात ‘ॐ नम: शिवाय’ चा ध्वनी आसमंतात निनादला. पाठोपाठ शुभ्र जटाधारी यती एका पर्णकुटीतून बाहेर येताना दिसला. अत्यंत भक्तिभावाने तिने त्यांना दंडवत घातले. थोडा वेळ ध्यानमग्न झालेल्या यतीने तिची सर्व कथा आणि व्यथा जाणली. ते म्हणाले, ‘मुली आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाक. आता तू एकटी नाहीस. तुझ्या उदरी परमात्म्याचा अंश वाढतो आहे. तुझ्या पोटी जन्माला येणारा जीव शंकराचा कृपाप्रसाद आहे. सर्व मानवांच्या उद्धारासाठी त्याचा अवतार आहे. या पर्णकुटीत त्याला लहानाचा मोठा कर. झोपडीत आवश्यक ते सर्व सामान आहे. माझी येथील साधना संपली आहे. मी हिमालयात चाललो आहे. भगवान शंकर तुझ्या पाठीशी आहेत. माझे तुला आशीर्वाद आहेत’ असे सांगून यती निघून गेले. ती त्या झोपडीत राहिली. शेतात कामाला येणार्या बायकांची अधून-मधून तिला सोबत झाली.शिरटीची एक म्हातारी तिच्याबरोबर सदैव राहिली. यथावकाश तिने एका तेजस्वी पुत्रास जन्म दिला.तेच हे श्री बुवाफन महाराज!
मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. त्याची आई शेतात छोटी-मोठी कामे करू लागली आणि मुलाला वाढवू लागली. मुलाला कळू लागल्यावर त्याने आईला विचारायला सुरूवात केली. मॉं इतर सर्वजण गावात चांगल्या घरात राहतात. बाकीच्या मुलांचे वडील, चाचे, मामे आहेत. माझे कुठे आहेत? ते सर्वजण आपल्याबरोबर का राहत नाहीत? ती म्हणायची, ‘बेटा, ही देवाची, शंकराची इच्छा आहे’ अशी प्रश्नोत्तरे वरचेवर व्हायची, तिचे एकच उत्तर ही भगवान शंकराची इच्छा आहे. एक दिवस तो मुलगा खूप चिडला. म्हणाला, ‘आम्हाला सगळ्यापासून दूर काढणारा, कष्टात, गरीबीत दिवस काढायला लावणारा तुझा शंकर कसला आहे? ते पाहिल्याशिवाय, त्याला जाब विचारल्याशिवाय आज मी काहीही खाणार नाही. तोंडात पाणीही घेणार नाही. आईने खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो इर्ष्येला पडला होता. नदीकडे तोंड करून उभा होता दिवसभर! ग्लानी येत होती, डोळे मिटत होते, मध्येच म्हणत होता, ‘सांग देवा! आम्हीच का असे? बोल, जबाब दे!’ रात्री बारा वाजेपर्यंत तो मुलगा आणि त्याची आई त्याच अवस्थेत उभी होती. तोंडात अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंब नाही. ती रात्र शिवरात्रीची मध्यानरात्र उलटली आणि चमत्कार झाला.समोर एक प्रकाशपुंज आणि त्यात साक्षात भगवान शंकर समोर उभे! अत्यंत प्रेमाने भोलेनाथांनी त्याला जवळ घेतले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याला त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. हे बुवाफन महाराज पंचक्रोशीत फिरून लोकांचे दैन्य, व्यथा, दारिद्य्र, रोग, पिडा, पिशाच्च, करनी, जारण, मारण आदी विवंचना नाहिशा करत. ते आपल्या परीने परिसरातील प्रत्येक मानव आनंदाने सुखाने जगावे यासाठी त्यांनी मोठी साधना केली यामुळे त्यांची किर्ती सर्वदूर पसरली. लोक आपल्या समस्या घेऊन त्यांच्या दर्शनाला येत आणि समस्या सोडवून ते मुक्त होऊन जात. मालगावचे लोक म्हणू लागले. ‘बाबा हमारे है!’ पण बाबा सर्वांचे होते. सर्व जातीधर्माचे लोक त्यांचे भक्त होते. इस्लामपूरचे एक शंभू आप्पा नावाचे कोष्टी समाजातले भक्त होते. ते एक लुगडे विणून घरी देणार आणि महाराजांच्या सेवेत हजर होणार, असा बरीच वर्षे त्यांचा जीवनक्रम होता. एकदा तर भर पुरात ते कृष्णा नदीतून पोहून महाराजांच्या दर्शनाला आले. तेव्हा बुवाफन महाराजांनी दीक्षा देऊन सांगितले की, तु केव्हाही आणि कुठेही माझे स्मरण कर, मी तुझ्यासमोर हजर आहे. त्यावेळेपासून ते इस्लामपूरातच राहिले. त्यांचाही मोठा भक्तगण होता. कधीकधी इस्लामपूरात लिंबाच्या झाडाखाली पारकट्ट्यावर या गुरूशिष्याला दर्शनाला आणि कृपाप्रसादाला खुप गर्दी व्हायची.एक प्रसंग असा सांगतात की, शंभू आप्पा त्या पारकट्ट्यावर आपल्या भक्तांशी बोलत असता एकदम बेशुद्ध होऊन पडले. सर्वजण घाबरून गेले. सुमारे पंधरा मिनीटांनी ते जागे झाले. तेव्हा लोकांनी काय झाले? म्हणून विचारले. त्यावेळी बाबा म्हणाले, माझा चिपळूणचा एक भक्त होडीतून समुद्रात जात असता समुद्रात पडून बुडत होता. त्याने माझा धावा केला. त्याला वाचविण्यासाठी जावे लागले. त्यांच्या सदराच्या दोन्ही बाह्या भिजल्या होत्या. त्या पिळून निघालेल्या समुद्राचे खारट पाणी लोकांनी चाखून पाहिले. आजही बुवाफन महाराजांचा उरूस भक्तगण मोठ्या भक्तीभावाने साजरा करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेशच सर्व समाजाला देत असतात. यावर्षी मोठ्या आनंदात हा उत्सव व उरूस साजरा होत आहे. यासाठी नेटके नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूस साजरा करण्याचा मान ओन्ली गजराज मंडळास मिळाला असून मंडळा बरोबरच राजा शिवछत्रपती तरुण मंडळ भाट गल्ली आणि जय हिंद मंडळ काळे गल्ली या तिन्ही मंडळाचे पदाधिकारी व सदस्य आणि कार्यकर्ते गेले महिनाभर उत्सव आणि उरूस साजरा करण्यासाठी परिश्रम घेत असून ५ दिवस यावर्षी उरूस साजरा होणार आहे. यानिमित्ताने गंधरात्र अभिषेक पूजा मानाचा गलेफ अर्पण करणे या धार्मिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा शर्यती कुस्त्यांचे जंगी मैदान सांस्कृतिक व करमणुकीचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण राज्यात सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस प्रसिद्ध आहे शहरातील सर्व नागरिक एकोप्याने हा उत्सव आणि उरूस साजरा करण्यासाठी संयोजन समितीला सहकार्य करीत असतात या निमित्ताने लाखो भाविक श्री बुवाफन महाराज मंदिरात आणि हजरत नूरखान बादशाह दर्गाह परिसरात दर्शनासाठी या चार दिवसाच्या कालावधीत येतात.