शिरोळ / चंद्रकांत भाट
शिरोळ येथील ग्रामदैवत हजरत नुरखान बादशाह उरूस अमाप उत्साहात प्रत्येकवर्षी साजरा केला जातो.बुवाफन महाराज उत्सवाबरोबरच हजरत नुरखान बादशाह उरूस सर्व धर्मियांचे लोक श्रध्देने साजारा करतात.उत्सव आणि उरूसानिमित्त सोमवार ते शुक्रवार या चार दिवसांच्या कालावधीत धार्मिक कार्यक्रमासह विविध स्पर्धा, शर्यती आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जागृत देवस्थान असलेले हजरत नुरखान बादशाह दर्गाह येथे दर्शनासाठी भाविकांची रिघ लागलेली असते.यावर्षी ओन्ली गजराज मंडळास उरूस साजरा करण्याचा मान मिळाला आहे.मंडळासह राजा शिवछत्रपती तरुण मंडळ यादव चौक भाट गल्ली,आणि जय हिंद मंडळ काळे गल्ली या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेली महिनाभर उत्सव व उरूस साजरा करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हजरत नूरखान बादशाह यांचा उरूस सर्वत्र प्रसिद्ध आहे. ग्रामदैवत हजरत नुरखान बादशहा उरूस सोमवार २५ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाला आहे. शिरोळ व परिसरातील भाविक मोठ्या भक्ती भावाने हा सोहळा साजरा करतात. उरुसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी शिरोळ नगरी सज्ज झाली. दर्गाह परिसरात रंगरंगोटी आणि विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.बुधवारी २७ डिसेंबर२०२४ रोजी दर्गाहचे पुजारी आणि मानकर्यांच्या उपस्थितीत नुरखान बादशहा समाधीस गंध व गलेफ अर्पण करण्यात येणार आहे. या गंधरात्र धार्मिक सोहळ्यास भाविकही उपस्थित राहत असतात.परिसरातील भक्तगण उरूस मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत.शिरोळ नगरीत भक्तिमय वातावरण बनले असून सर्व धर्मीयांचे लोक मनोभावे हजरत नूरखान बादशाह यांची आराधना करीत आहेत.
सुमारे २५०० वर्षे होऊन गेली, शिरोळ गाव इतिहासकालीन आहे. याच भूमीवर शूरविरांच्या रांगा पडल्या आहेत. ही भूमी युध्द भूमी म्हणूनच नोंद झाली आहे. शिरोळ परिसर संपूर्ण जंगलमय होता. पूर्वी याच परिसरात पश्चिमेच्या बाजूस हजरत नुरखान बादशाह यांच्या समाधीची वास्तू आहे. ही वास्तू म्हणजे गोलघुमटच आहे.वास्तू तशी भव्य होती.सद्यस्थितीत तिचा काही भाग पडलेला आहे. या वास्तूची उंची २०० फूट आहे. आतील परिसर ६० ते ७० फुटाचा आहे. सूर्यास्ताच्यावेळी या घुमटाची सावली घालवाड रस्त्याच्या मध्यभागी पडत असे.घुमटाच्या आतील समाधीचा भाग खोल आहे. पूर्वी हा खंदकाचा भाग होता.या समाधीतून कोल्हापूर रंकाळा तलावाच्या ठिकाणी भुईकोट भागात असलेला रस्ता पूर्वीचा गुप्तरस्ता म्हणून ओळखला जात होता.हजरत नुरखान बादशाह यांनी संकटात असणार्यांना मदत केली.त्यांच्या अडी-अडचणी सोडवल्या.सर्वांना भक्तीचा मार्ग दाखवला. ते या परिसरातील थोर धर्मप्रचारक होऊन गेले. ते प्रेमळ आणि दानशूर होते. शिरोळ पंचक्रोशीत त्यांची मोठी किर्ती होती. स्वतः हजरत नूरखान बादशाह यांनी थोर साधूंचे आचार विचार आत्मसात केले अल्लाहची प्रार्थना केली या परिसरातील प्रत्येक मनुष्य सुखी समाधानी राहावा यासाठी त्यांनी आपल्या भक्तीचा वापर केला नुरखान बादशाह शिरोळ नगरीत वास्तव्य करून त्यांनी सर्वांना समानतेने वागण्याचा संदेश दिला. त्यांची परमेश्वरावर श्रध्दा होती. शिरोळ नगरीत हिंदू मुस्लिम ऐक्याने राहून आनंदाने आणि उत्साहाने उरुस साजरा करतात.
बादशाह हा शेवटी आपल्या कर्तृत्वाने महान असतो. नूरखान बादशाह दर्गाह तो परिसर निसर्गमय शांततापूर्ण आहे.बादशहाची शेवटची इच्छा होती की,आपल्या धर्मीय लोकांची कबर असावी म्हणून मुस्लिम धर्माचे कब्रस्थान बादशाहच्या समाधीच्या शेजारी आहे.पंचक्रोशीतील भक्तगणांची हजरत नूरखान बादशाह यांच्यावर मोठी श्रध्दा आणि भक्ती होती.म्हणूनच वर्षातून दोन दिवस त्यांचा उरूस बुवाफन महाराज उत्सवाबरोबर सर्व धर्मीय लोक साजरा करतात.हजरत नूरखान बादशाह यांच्या समाधीस्थळी भाविक भक्ती भावाने गलिफ व श्रीफळ अर्पण करून नैवेद्य देऊन, पुष्प वाहून, धुप अगरबत्ती देऊन दर्शन घेतात. सर्व धर्मीयांचे लोक दर्शनासाठी येऊन हजरत नूरखान बादशाह यांची मनोभावे पूजा करून प्रार्थना करतात. उरुसाच्या मुख्य दिवशी गुरुवारी बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समिती आणि शिरोळ नगर परिषदेच्या वतीने मिरवणुकीने शाही थाटात पारंपारिक वेशभूषेत शोभेच्या दारूची आतषबाजी करीत मानाचा गलेफ अर्पण करतात.
यावेळी पंचक्रोशीतील मान्यवर उत्सव व उरूस समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि नगरपालिकेचे पदाधिकारी आणि भक्तगण मोठ्या संख्येने येऊन हजरत नूरखान बादशाह यांचे दर्शन घेतात.सोमवार ते शुक्रवार या कालावधीत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यती, स्पर्धा, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन उरूस संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. गेली दोन दिवस शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. हजरत नुरखान बादशाह दर्गा आणि श्री बुवाफन महाराज मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला असून दोन्ही धार्मिक स्थळावर दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे.सर्व धर्म समभावाचे प्रतीक असणारे श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस साजरा करण्याकरिता येतील ओन्ली गजराज मंडळ कोळी गल्ली राजा शिवछत्रपती तरुण मंडळ यादव चौक भाट गल्ली जय हिंद मंडळ काळे गल्ली या तिन्ही मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य गेली महिनाभर परिश्रम घेत होते चार दिवसाच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.