अशोकराव माने समर्थकांचा जल्लोष तर कॉग्रेस कमिटीत,मिणचेकर कार्यालयासमोर शुकशुकाट
हातकणंगले / प्रतिनिधी
सुरुवातीला अटीतटीची होईल असे वाटत असलेल्या हातकणंगले विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या बाजूने एकतर्फी मताधिक्य मिळत होते . त्यामुळे माजी आमदार राजूबाबा आवळे व माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली.यामुळे काँग्रेस कमिटीसमोर व मिणचेकर यांच्या संपर्क कार्यालयासमोर शुकशुकाट पसरला.तर अशोकराव माने यांच्या समर्थकांनी तहसिल कार्यालयाच्या परिसरात प्रचंड जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. काँग्रेस कमिटीत व मिणचेकर यांच्या संपर्क कार्यालयात निवडणुकीच्या निमित्ताने नेहमी कार्यकर्त्यांची गर्दी असायची आज मतमोजणी असल्याने सकाळी -सकाळी मोठ्या उत्साहाने कार्यकर्ते आले होते.मतमोजणीस सुरुवात झाली निवडणुकीचा कल महायुतीचे उमेदवार यांच्या बाजूने झुकू लागताच,दोन्हीही माजी आमदारांच्या समर्थकांत अस्वस्थता पसरत होती.जसजसे निकालाचे कल विरोधात जाऊ लागताच मिणचेकर व आवळे यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातून जाणे पसंत केले.यामुळे दोघांच्याही कार्यालयात शुकशुकाट पसरला.तर अशोकराव माने यांचे मताधिक्य वाढून विजय निश्चित होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.