धार्मिक सोहळ्यासह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम, शर्यती, स्पर्धेचे आयोजन
शिरोळ / प्रतिनिधी
सर्वत्र प्रसिद्ध असणारे आणि शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत साजरा होत आहे. यानिमित्ताने धार्मिक सोहळ्याबरोबरच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम,शर्यती,स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीचे मार्गदर्शक युवानेते पृथ्वीराजसिंह यादव,अध्यक्ष केतन चव्हाण,उपाध्यक्ष संकेत कोळी यांनी दिली.यावर्षी श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूस साजरा करण्यासाठी उत्सव व उरूस संयोजन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते गेली महिनाभर परिश्रम घेत आहेत. सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत हा उत्सव आणि उरूस मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा होत आहे.उत्सव व उरूसाची तयारी पूर्ण झाली आहे. श्री बुवाफन महाराज मंदिर परिसर व हजरत नूरखान बादशाह दर्गाह परिसरात रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.उत्सव आणि उरुसानिमित्त सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी श्री बुवाफन महाराज समाधी स्थळावर महापूजा व महाभिषेक मंदिराचे पुजारी हिरेमठ स्वामी, वीरशैव लिंगायत माळी समाज आणि भक्तांच्यावतीने अर्पण करण्यात येणार आहे येथील विठ्ठल मंदिर येथे पुरुष गटाची रांगोळी स्पर्धा, तर श्रीराम मंदिर येथे महिला गटातील रांगोळी स्पर्धा होणार आहे. त्यानंतर राजश्री शाहू वाचनालयात गाव मर्यादित दुहेरी कॅरम स्पर्धा होणार आहे. याच दिवशी व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहे. भाट व काळे गल्ली येथे मोटरसायकल बरोबर रेडकू पळवणे, मोटरसायकल बरोबर म्हैस पळवणे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सर्व स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि कायम चषक बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.सोमवारी रात्री गंधरात्र हा धार्मिक सोहळा होणार आहे.यावेळी शहरातील प्रमुख मानकरी,दिवटीचे मानकरी, समस्त माळी समाज, मंदिराचे पुजारी हिरेमठ स्वामी व भक्तगणांच्या उपस्थितीत श्री बुवाफन महाराज समाधीस गंध लावून मानाचा गलिफ अर्पण करण्यात येणार आहे. यानंतर रात्री पद्माराजे विद्यालयाच्या मानधने क्रीडांगणावर सुभाष हिलगे निर्मित वैभव डान्स म्युझिकल नाईट यांचा मनोरंजन व करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ हा श्री बुवाफन महाराज उत्सवाचा मुख्य दिवस या दिवशी कनवाड रोड मिठारगी येथे गावातील बिनदाती,व दोनदाती बैलगाडी शर्यत, गावातील घोडागाडी शर्यत,गावातील दुबैल गाड्यांच्या शर्यती होणार आहे.तसेच अर्जुनवाड रस्ता येते पुरुष व महिला गटाच्या मॅरेथॉन स्पर्धा, तसेच हातगाडा स्पर्धा आणि पुरुष व महिला गटातील सायकल स्पर्धा आयोजित केली आहे. या सर्व शर्यती व स्पर्धेमधील विजेत्यांना रोख रक्कम व कायम चषक पारितोषिक म्हणून दिले जाणार आहे.मंगळवारी दिवसभर श्री बुवाफन महाराज मंदिरात भक्तांच्यावतीने नैवेद्य व गलिफ अर्पण करण्यात येतो. सायंकाळी उत्सव व उरूस संयोजन समिती आणि शिरोळ नगरपरिषद यांच्यावतीने आकर्षक शोभेच्या दारूची आतिषबाजी आणि शाही मिरवणुकीने श्री बुवाफन महाराज समाधी स्थळास मानाचा गलिफ अर्पण करण्यात येणार आहे.यावेळी कर्नाटक राज्याचे मंत्री सतीश जारकीहोळी, श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, दलित मित्र डॉ. अशोकराव माने, बिग बॉस फेम धनंजय पवार (डी.पी) यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.रात्री पद्माराजे विद्यालयाच्या मानधने क्रीडांगणावर मुंबई येथील कलाकारांचा डान्स शो बॉलीवूड नाईट हा मनोरंजन व करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी कनवाड रोड मिठारगी येथे खुला बैल पळवणे, घोड्यावर बसून शर्यत,गावातील कामाठी बैलगाडी शर्यत होणार आहे. यानंतर दत्त भांडार परिसरात महिला व पुरुष गटातील स्केटिंग स्पर्धा होणार आहेत. शिरटी रस्ता येथे गाडीमागून श्वान पळविण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या सर्व शर्यती व स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि कायम चषक बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.बुधवारी दुपारी ३ वाजता श्री बुवाफन मंदिरासमोरील कै.माजी आमदार दिनकररावजी यादव कुस्ती आखाडा येथे कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.उपमहाराष्ट्र केसरी व भोसले व्यायाम शाळा सांगलीचा मल्ल पै.संदीप मोटे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन शिवनेरी तालीम अकलूजचा मल्ल पै.संतोष जगताप यांच्यात पहिला क्रमांकाची कुस्ती होणार आहे.तसेच या मैदानात अनेक लहान मोठ्या चटकदार कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत.यावेळी खासदार विशाल पाटील,धैर्यशील मोहिते पाटील, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे,शरद कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर,दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, आण्णासो पुजारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.बुधवारी रात्री हजरत नूरखान बादशाह समाधीस गंध व गलिफ अर्पण करण्याचा गंधरात्र सोहळा पारंपारिक मानकरी भक्तगण दर्ग्याचे पुजारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.रात्री पद्माराजे विद्यालयाच्या मानधने क्रीडांगणावर कै तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा करमणुकीचा व मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी कनवाड रोड मिठारगी येथे जनरल घोडागाडी शर्यत अ व ब गटातील जनरल दुबैली गाड्यांच्या विराट शर्यती होणार आहेत. या शर्यतीमधील विजेत्यांना रोख रक्कम व कायम चषक बक्षीस म्हणून दिले जाणार आहे.गुरुवारी सायंकाळी उत्सव व उरूस संयोजन समिती व नगरपरिषदेच्या वतीने शाही थाटात पारंपारिक वेशभूषेत शोभेच्या दारूच्या अतिषबाजीत हजरत नूरखान बादशाह समाधी स्थळास मानाचा गलीफ अर्पण करण्यात येणार आहे.यावेळी आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे, माजी नगरसेवक शरद उर्फ बापू मोरे, उद्योगपती राजेश पाटील, गजानन देसाई, डॉ सतीश पाटील, रावसाहेब देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गुरुवारी रात्री पद्माराजे विद्यालयाच्या मानधने क्रीडांगणावर सत्कार व बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके, भूमी अभिलेख उपाधीक्षक पल्लवी उगळे, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, गट विकास अधिकारी नारायण घोलप, पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंडराव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी पद्माराजे विद्यालयाच्या मानधने क्रीडांगणावर खास महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कै.अंजनादेवी दिनकरराव यादव व कै.मीना अशोकराव यादव यांच्या स्मरणार्थ सौ ज्योत्स्ना पृथ्वीराज यादव व सौ जागृती राहुल यादव यांच्यावतीने या कार्यक्रमातील विजेत्यांना बक्षीस व पैठणी देण्यात येणार आहेत. यावेळी सोनाली मगदूम, कविता चौगुले, चंद्रकला पाटील, माधुरी सावगावे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.येथील छत्रपती शिवाजी चौक भाजी मंडई येथे एकतारी भजनी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सर्व विजेत्यांना श्री बुवफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीच्या वतीने रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.उत्सव आणि उरूसानिमित्त आयोजित केलेल्या सर्व शर्यती या शासनाच्या नियमास व अटीस अधीन राहून विना लाठी काठी होणार आहेत याची सर्व शर्यती स्पर्धकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.उत्सव व उरूस साजरा करण्याकरिता श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरूस समितीचे मार्गदर्शक युवानेते पृथ्वीराजसिंह यादव,अध्यक्ष केतन चव्हाण, उपाध्यक्ष संकेत कोळी, कार्याध्यक्ष महेश काळे यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य परिश्रम घेत आहेत.