विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता .
प्रचारात यड्रावकरांची सरशी,गणपतराव पाटील यांचा झंझावात,”सतेज” हात तारणार? उल्हास पाटीलांची मुसंडी कि घसरगुंडी आज आणि उद्या होणार मतदारांना लक्ष्मी दर्शन
संभाजी जाधव – विशेष
हा लेख प्रसिद्ध होत असताना विधानसभा निवडणुकीच्या उघड प्रचाराची सांगता झाली.तिनही प्रमुख उमेदवारांनी साम दाम दंड भेद अवलंबत ताकतीने प्रचार केला.प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी आज आणि ऊद्या चतूर्थी आणि पंचमीच्या मुहूर्तावर लक्ष्मीदर्शनासह धनलाभाचे योग आहेत.उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठका सभा प्रचारफेऱ्या मेळावे नेत्यांचे दौरे आरोप प्रत्यारोपांनी गेल्या आठदहा दिवसात वातावरण ढवळून निघाले.प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारसंघात महायुती पुरस्कृत शाहू विकास आघाडीचे उमेदवार आम . राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रचारात सरशी दिसून आली.गेल्या चार वर्षात केलेलीविकासकामेआणि येत्या काळात तालुक्याच्या विकासासाठी काय करणार यावर भर देत त्यांनी टिका टिप्पणी न करता त्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला.तर मविआचे उमेदवार गणपतराव पाटील यांनीही नेटके नियोजन करून प्रचारात झंझावात तयार केला.जमिन क्षारपडमुक्ती सह जनतेच्या सेवेसाठी २४ तास तत्पर रहाण्याचा शब्द देत त्यांनी सा.रे.पाटील यांचे खरे राजकिय वारसदार असल्याचे सांगत मतदारांना
भावनिक साद घातली असली तरी काँग्रेसचा “सतेज ” हात त्यांना तारणार का ? हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे .परिवर्तन महाशक्ती आघाडीतून स्वाभिमानीचे उमेदवार उल्हास पाटील यांनीही राजू शेट्टी यांच्यासोबत पूर्ण मतदार संघ पिंजून काढला.मात्र मातोश्री वरून थेट शिवारात शिरलेल्या उल्हास पाटील यांची मुसंडी कि घसरगुंडी होणार हे पहावे लागेल शिरोळ विधानसभेसाठी दहा उमेदवार रिंगणात असले तरी या प्रमुख तीन पाटलांतच चुरस होणार आहे.आम.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गेल्या साडेचार वर्षात एक हजार नऊशे कोटी विकास निधी मंजूर करून आणला.तालुक्यात केलेल्या विवीध विकास कामांचा लेखा जोखा मांडणारी एक पुस्तीका त्यांच्याकडून घराघरात पोहचवण्यात आली आहे.त्यातील विकासकामांच्या बाबींवर विरोधी उमेदवार अथवा मतदारांतून कोणतेच भाष्य किंवा प्रतिक्रीया उमटली नाही.याचा अर्थ त्यांनी तालुक्यात केलेली व या पुस्तीकेत मांडलेली विकासकामे सर्वांनी मान्य केल्याचे स्पष्ट झाले.जयसिंगपूर येथिल छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शब्द त्यांनी पाळला.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणीचे दिलेले आश्वासन पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे.तालुक्यात कोरोना महापूर आपतीत त्यांनी आपत्ती ग्रस्तांच्या मदतीसाठी ठाण मांडले.आरोग्यसेवा दळणवळण पाणीपुरवठा योजना जमिन क्षारपड मुक्तीसाठी मोठा निधी उपलब्ध करून घेतला.येत्या काळात ज्या शेतकऱ्यांनी जमिन क्षारपड मुक्तीसाठी बँक कर्जे घेतली आहेत.ती कर्जे माफ करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले .जात पात पक्ष गट तट न पहाता कायम जनसंपर्कात राहीले.प्रचारात या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या.महाविकास आघाडीचे गणपतराव पाटील यांच्या प्रचाराचे नेटके नियोजन झाले.प्रचाराचा झंझावात दिसून आला.प्रचारात त्यांनी पक्षीय धोरणे प्रभावीपणे मांडली . मात्र स्थानिक विकासाच्या ; प्रश्नांच्या मांडणीत व उपाय योजनांबाबतीत त्यांच्या प्रचाराचा प्रभाव दिसला नाही . जमिन क्षारपड मुक्ती चळवळ आणि स्वच्छ प्रतिमा यासह मी तुमचा सेवक म्हणून काम करेन वैगेरे आश्वासनेही त्यांनी प्रचारात दिली.त्यांच्या पाठीराख्यांनी विद्यमान आमदारांवर केलेली विकासनिधीतील टक्केवारीची टिका अंगलट येणार असल्याची चर्चा आहे.कारण कांही महिन्यांपूर्वी झालेल्या दत्त साखर कारखानाच्या निवडणूकीवेळी विरोधी आंदोलन अंकूशने विस्तारीकरण सहविजप्रकल्प यांत भ्रष्टाचार झाल्याचे जाहीर आरोप केले होते.त्याची फेर उजळणी या प्रचाराच्या निमित्ताने पुन्हा झाली.विद्यमान आमदारांनी जमिन क्षारपड मुक्तीसाठी आणलेला शासननिधि तर दुसरीकडे गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांना आपल्या बँकेकडून दिलेले व्याजी कर्ज याचीही तुलनात्मक चर्चा मतदारांत झाली .स्व.आम.डॉ.सा.रे.पाटील यांचे वारसदार प्रकरण विनाकारण प्रचारात आणले गेले.त्याचाही परिणाम गणपतराव पाटील यांच्या प्रचारावर व प्रभावांवर होणार असल्याच्या चर्चा आहेत.एकूण प्रचारात दलित मागासवर्गीय अल्पसंख्यांक आणि जातींच्या मतांच्या भरवशावर आणि गणितांवर चा “सतेज ” हात गणपतराव पाटील यांना साथ देणार का? हे पहावे लागेल.मविआचा हात सोडून मातोश्री वरून थेट शिवारात शिरलेल्या माजी आमदार उल्हास पाटील यांनी आपल्या जून्या स्वाभिमानी जोडीदाराला कवटाळले.त्यांची उमेदवारी घेतली. त्यांच्या तत्कालीन आमदारकीला बळ देणाऱ्या बहूजन समाज व स्वाभिमानीचा शेतकरी व कांही शिवसैनिक मतदार यांना गृहीत धरून त्यांनी जोरदार प्रचार केला.मात्र काल परवा पर्यंतच्या त्यांच्या कारखानदारांशी असलेल्या “दोस्ताना ” ची चर्चाही मतदारांत तितक्याच जोरदारपणे झाली . उर्वरीत सात अन्य उमेदवार किती मते खाणार ?व किती मतदार मतपत्रिकेवरील “नोटा ” कडे वळणार हे ही महत्वाचे ठरणार आहे.मात्र एकूण प्रचाराच्या शेवटापर्यंत विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र पाटील यांनी आघाडी घेतल्याचे चित्र ठळक झाले आहे.आज आणि उद्या घडणाऱ्या छुप्या प्रचारातील घाडामोडी २३ तारखेच्या निकालाला कोणते वळण देतात हे पहावे लागेल.