गुळगुळीत कागदावरील “विकास” भ्रष्टाचाराने बरबटलेला : कॉम्रेड आप्पा पाटील

Spread the love
कामामधील टक्केवारीच्या पैशातून मतं विकत घेण्याची वल्गना
शिरोळ / प्रतिनिधी 
शिरोळ तालुक्यात शासनाकडून मिळालेल्या निधीतून तालुक्यात विकास कामे करताना प्रचंड भ्रष्टाचार झाला.यामुळे ही सर्व कामे निकृष्ट आणि दर्जाहीन झाली आहेत.मात्र एका कलरफुल गुळगुळीत कागदातील पुस्तकातून आपण केलेल्या विकास कामाची टिमकी वाजवणाऱ्या मालकांनी या कामात किती टक्केवारी घेतली आहे.याची चर्चा तालुक्यात सुरू असून दर्जाहीन काम करणाऱ्या आणि स्वतःचा स्वार्थ साधलेल्या आणि टक्केवारीमधून पैशातून मतं विकत घेऊन निवडून येण्याची वल्गना करणाऱ्या त्या लोकप्रतिनिधीला जनता घरीच बसविणार असून शिरोळ विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील हेच प्रचंड मताधिक्याने विजयी होतील.असा विश्वास अब्दुल्लाटचे सुपुत्र, चळवळीचे नेते कॉम्रेड आप्पा पाटील यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
कॉम्रेड आप्पा पाटील पुढे म्हणाले की आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात शासनाकडून मिळालेल्या निधीतून १९०३ कोटी रुपयाची विकास कामे पूर्ण केली असल्याचे माहिती देणारे कलरफुल गुळगुळीत कागदावरील २०८ पानाचे पुस्तक सध्या घरोघरी वाटण्यात येत आहे.ही विकास कामे पूर्ण करत असताना ठेकेदारांकडून मालकांनी किती टक्केवारी घेतली याचीही प्रसिद्धी करणे गरजेचे होते.मालकांनी घेतलेल्या टक्केवारीमुळेच शिरोळ तालुक्यातील अनेक विकास कामे निकृष्ट आणि दर्जाहीन झाली आहेत.शासनाचा निधी खड्ड्यात घालण्याचा प्रकार या लोकप्रतिनिधींनी केला आहे. अशा लोकप्रतिनिधींना जनता पुन्हा निवडून देणार नाही याची मला खात्री आहे.जनतेला मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनकर्त्यांची असते. शासनाचा लोकप्रतिनिधी म्हणून ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यात ऐवजी मिळालेल्या निधीतून ढपला पाडण्याचा उद्योग झाल्यामुळेच शिरोळ तालुक्यातील विकास कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला. असे सर्वत्र बोलले जात आहे.वास्तविक पाहता जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यासाठी निधी मिळत असतो. यामध्ये शुद्ध मुबलक पाणी योजना,रस्ते करणे,गटर्स बांधणे, आरोग्य सुविधा पुरविणे, दिवाबत्ती,सांस्कृतिक सभागृह बांधणे,खेळाचे क्रीडांगण तयार करणे,स्मशानभूमी दुरुस्ती करणे, शासकीय कार्यालयासाठी लागणाऱ्या इमारती बांधणे,पेजल योजनेसाठी देण्यात येणारा निधी, व्यायामासाठी लागणारे साहित्य बसविणे,बस स्थानक सुशोभीकरण करणे, प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन बसेस उपलब्ध करणे, पर्यटन स्थळ सुशोभीकरणाकरिता प्रत्येक वर्षी शासनाकडून निधी मिळतच असतो अशा निधीची राज्याच्या अर्थसंकल्पातच तरतूद केली जात असते. यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाही शासनाकडूनच निधी मिळत असतो. शासनाकडून आलेल्या निधीतून काम करत असताना ठेकेदारांकडून टक्केवारी घ्यायची असा प्रकार शिरोळ तालुक्यात झाला आहे.यामुळे तालुक्यातील गुणवत्तापूर्ण व दर्जेदार विकास कामे होण्याऐवजी निकृष्ट व दर्जाहीन विकास कामे झाली. केलेल्या रस्त्यांवर मोठ-मोठी पुन्हा खड्डे पडले आहेत.शिरोळ पंचगंगा बंधाराच्या दुरुस्तीसाठी दिलेला निधी दर्जाहीन कामामुळे वाया गेला. शिरोळच्या छत्रपती संभाजी चौकातील रस्त्याची गेल्या पाच वर्षात कितीतरी वेळा दुरुस्ती केली मात्र रस्त्याची परिस्थिती दयनीय आहे. हा निधी रस्त्याच्या खड्ड्यातच गेला ‌. हे वास्तव नाकारून चालणार नाही.
चिपरी येथे केलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे तेथील नागरिकांनी ठेकेदाराला तो पुन्हा रस्ता करण्यास भाग पाडले. अशी परिस्थिती असताना या लोकप्रतिनिधीने त्याच ठेकेदाराला पुन्हा तालुक्यातील अनेक मोठी विकास कामे देऊन त्याचाही आणि आपलाही खिसा भरला हे वास्तव असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीत विकास कामाच्या माध्यमातून मिळवलेल्या टक्केवारीच्या पैशाच्या जोरावरच मतदान विकत घेण्याची भाषा बोलली जात आहे.यामुळे या लोकप्रतिनिधीच्या विरोधात जनतेत तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त होत आहे.ज्यांचा वारसा सांगून राजकारण करत आहेत त्यांनी कधीही मतदान विकत घेऊन आपली राजकीय पोळी भाजली नाही.पण अनैतिकतेतून मिळवलेल्या पैशावर मतं विकत घेण्याची पद्धत या मालकांनी सुरू केली आहे.यामुळे शिरोळ तालुक्याचे मोठे नुकसान झाले. लोकप्रतिनिधी म्हणून शिरोळ तालुक्यात विद्यार्थ्यांच्यासाठी एखादं चांगलं महाविद्यालय मंजूर करून आणणे, सुशिक्षित बेरोजगारांच्या आयटी पार्क,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणे,तालुक्यातील अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी एखादा मोठा उद्योग उभा करणे,महिलांसाठी कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारे प्रकल्प उभा करणे, शेतकऱ्यांचे हित साधणाऱ्या योजना आणणे, तालुक्यातील शासकीय निमशासकीय व प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरावा करणे, अशा अनेक योजना तालुक्याच्या विकासासाठी करणे आवश्यक होते मात्र ते त्यांच्याकडून झाले नाही.आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम करत असताना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुधारणा करणे, ग्रामीण रुग्णालयातील गरजेच्या व आवश्यक असणाऱ्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे आजही तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधेसाठी खाजगी रुग्णालयात जावे लागते हीच जनतेची शोकांतिका आहे.तालुक्यातील तळागाळातील जनतेला अन्न,वस्त्र,निवारा यासह कुटुंबाची प्रगती होण्याकरिता लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे अपेक्षित होते मात्र तसे शिरोळ तालुक्यात घडले नाही. केवळ आपला उदो उदो करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पोषण करून विशिष्ठ विकास कामांना मिळालेल्या निधीचे भांडवल करून निवडणुकीत मताचा जोगवा मागण्याचे काम या गुळगुळीत कागदाच्या पुस्तकाच्या माध्यमातून होत आहे.पण जनतेला तालुक्यातील विकास कामाचा इतिहास माहीत असल्यामुळे आपल्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही.शिरोळ विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि चरित्रसंपन्न व निर्व्यसनी असणाऱ्या गणपतराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.त्यामुळे शिरोळ तालुक्याचा आमदार गणपतराव पाटीलच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
error: Content is protected !!