हक्काचे प्रॉपर्टी कार्ड देईल त्याच्या पाठीशी ४०० कुटुंबाचा निर्धार
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरातील गेली ५० वर्षाहून अधिक काळ शासनाच्या अतिक्रमण जागेमध्ये वास्तव्यास असणाऱ्या सुमारे ४०० कुटुंबीयांनी आजही प्रॉपर्टी कार्ड नसल्याने घर बांधणी, मुलांचे शिक्षण इतर शासनाच्या योजना,बँक कर्ज आदी कामात अडथळा येत असल्याने या कुटूंबियांना शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.आपल्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी गेली ५० अनेक वर्ष शिरोळ शहरातील जावईवाडी, शिवाजीनगर यासह परिसरातील अनेक कुटुंबिय शासन स्तरावर लढा देत आहेत.पालकमंत्री,खासदार,आमदार, जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी,तहसीलदार,नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्याकडे निवेदन देऊन लढा देत आहेत. मात्र त्यांच्या या निवेदनाला सर्वच लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आहे. निवडणूक काळात आश्वासनाची खैरात करून गेली पन्नास वर्षे या कुटुंबांना शासकीय योजना पासून वंचित ठेवले जात आहे.दरम्यान २००५, २००६, २०१९, २०२१, आणि २०२४ या प्रलयंकारी महापुरात अनेक घरे पडल्याने कुटुंब उध्वस्त झाली.कागपत्राअभावी त्यांना शासनाची मिळणारी नुकसान भरपाई मिळाली नाही, जयसिंगपूर कुरुंदवाड अकिवाट या भागातील अतिक्रमण धारक कुटुंबियांचा प्रश्न मार्गी लागत आहे मात्र शिरोळ मधील या ४०० कुटुंबीयांचा कोठेच दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.त्यामुळे या वंचित कुटुंबीयांनी आता लोकशाही मार्गाने आपल्या हक्काच्या मतदानातून आता एकजूट बांधत जो उमेदवार आपल्या हक्काचं प्रॉपर्टी कार्ड देईल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार ४०० कुटूंबियांनी केला आहे.