जनतेच्या विश्वासावरच आमदारकीच्या निवडणूकीत माझा विजय निश्चित
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणपतराव पाटील यांचा विश्वास
शिरोळ / प्रतिनिधी
सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याला प्राधान्य देण्याची माझी भूमिका आहे. त्याच पद्धतीने सर्वसामान्य जनतेचे हित जपण्यासाठी मी काम करणार आहे. जनतेच्या विश्वासावरच मी आमदारकीची निवडणूक लढवीत असून माझा विजय निश्चित आहे.महाविकास आघाडी आणि सर्वच मित्र पक्षांनी एक विचाराने दिलेल्या पाठिंब्यावर विजय रुपी आशीर्वाद मला मिळणार आहे, असा विश्वास महाविकास आघाडीचे शिरोळ विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी व्यक्त केला.गणपतराव पाटील यांनी आज शिरोळ विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे म्हणाले,गणपतराव पाटील यांच्या रूपाने शांत,संयमी आणि मनमिळाऊ उमेदवार आपल्याला मिळाले आहेत.लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसाठी गणपतराव पाटील यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केले.त्यामुळे आज त्यांच्यासाठी आम्ही सर्वच महाविकास आघाडीतील घटक पक्ष एक पाऊल पुढे ठेवून काम करणार आहोत. गणपतराव पाटील दादांच्या रूपाने स्वच्छ उमेदवाराला मतदान करूया आणि महाविकास आघाडीची सत्ता आणूया.छ.शिवाजी महाराज तक्त येथे झालेल्या मेळाव्यात मिनाज जमादार,संदीप बिरणगे,मंगलताई चव्हाण,दिलीप कलावंत,वैशालीताई जुगळे,रावसाहेब भिलवडे,रामदास मधाळे,सुमनताई चव्हाण,दस्तगीर जमादार,वृषभ चौगुले,ए.जी.मुल्ला,तातोबा पाटील, वेदिका भुजुगडे,हसन देसाई,अरविंद धरगुत्तीकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून गणपतराव पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.प्रारंभी जयसिंगपूर येथून प्रचंड मोठी मोटारसायकल रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.पंचायत समिती मधील सर्व महापुरुषांना तसेच छ.शिवाजी महाराज तक्त,छ.रणरागिणी ताराराणी गादीला वंदन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्री बुवाफन महाराज समाधी स्थळावर फुले वाहण्यात आली.भारतीय संविधानाचे पूजनही झाले.स्वागत अनिलराव यादव यांनी केले.सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले.यावेळी पृथ्वीराज यादव,धनाजी पाटील नरदेकर,दरगु गावडे यांच्यासह महाविकास आघाडी आणि मित्र पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.