शिरोळ / प्रतिनिधी
महाविकास आघाडीकडून दत्त साखर कारखान्याचे माजी चेअरमन गणपतराव पाटील यांना कॉग्रेस पक्षाने शिरोळ विधानसभेची उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील व समर्थक नाराजी झाले आहेत.मात्र उल्हास पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्याने गणपतराव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे.तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व माजी आमदार उल्हास पाटील यांची अंतर्गत यंत्रणा सुरू असल्याने गणपतराव पाटील गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.विधानसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी कॉग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी शनिवारी नाराज उल्हास पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली मात्र उल्हास पाटील भेटले नसल्याने अस्वस्थता वाढली आहे.यामुळे उल्हास पाटील आज मोठ्या निर्णय घेणार हे आता स्पष्ट झाले आहे.आज उल्हास पाटील यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा आहे.तत्पूर्वी गणपतराव पाटील यांचे जवळचे व विश्वासू सहकारी सर्व ‘शक्ती’ निशी उल्हास पाटील यांच्या निवासस्थानी सकाळ पासून तळ ठोकून आहेत.पण उल्हास पाटील यांची आज ही भेट होत नसल्याने नाराजी कशी दूर करायची असा प्रश्न विश्वासू सहकाऱ्याला पडला आहे.उल्हास पाटील व राजू शेट्टी यांच्या निर्णयावरच गणपतराव पाटील गटाचे भवितव्य अवलंबून आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आता चुरस वाढली असून सद्या दुरंगी दिसणारी लढत तिरंगी की चौरंगी होणार हे ४ तारखेनंतर स्पष्ट होणार आहे.