तब्बल दहा वर्षानंतर शिरोळच्या मतपत्रिकेवर येणार हात
दोन मोठ्या पाटील यांच्यात होणार काट्याची टक्कर
तिसऱ्या पाटीलांच्या खेळीवर अवलंबून ‘निकाल’
संभाजी जाधव / धरणगुती
महाविकास आघाडीकडून शिरोळची जागा राष्ट्रीय काँग्रेसला देण्यात आली.गणपतराव पाटील यांना उमेदवारी मिळताच शिरोळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य आलेआहे.तर गणपतराव पाटील यांच्या काँग्रेस उमेदवारीने शिरोळ विधानसभा मतदारसंघाच्या मतपत्रिकेवरून गायब झालेले काँग्रेसचे हात हे चिन्ह तब्बल दहा वर्षानंतर दिसणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत स्व.सा.रे पाटील यांनी या चिन्हावर शेवटची निवडणूक लढवली होती. तेंव्हापासून शिरोळ तालुक्यात हात हे चिन्ह मतपत्रिकेवरून गायब होते.चालू निवडणूकीत विद्यमान आम.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर आणि काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील या दोन मोठ्या पाटलांत कांटे की टक्कर होणार आहे.मात्र सध्या स्वाभिमानीच्या घरवापसीच्या चर्चेत असलेले शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील कोणती भूमिका घेणार यावरच उमेदवार असलेल्या दोन मोठया पाटलांचा निकाल ठरणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्य चौरंगी लढतीत काँग्रेसचे सा.रे. पाटील यांना ४८१४१ मते मिळाली होती. तर शिवसेनेकडून अचानक लढलेले उल्हास पाटील यांनी ७०७७९ मते मिळवून १९९६३ माताधिक्याने विजय मिळवला होता.तर राष्ट्रवादीकडून लढलेले डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दुसऱ्या क्रमांकाची ५०८४३ मते मिळाली होती. २०१९ च्या निवडणूकीत हे चित्र बदलून शिवसेनेच्या उल्हास पाटील यांचा अपक्ष उमेदवार डॉ . राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी २७८२४ मताधिक्यांने पराभव केला होता.त्यावेळी काँग्रेसचा उमेदवार नसला तरी काँग्रेसची रसद मात्र यड्रावकरांच्या पाठीशी होती. तालुक्यातील राजकारणात गेल्या दहावर्षाच्या काळात सा.रे.पाटील यांचे निधन आणि राज्यात काँग्रेसची झालेली पडझड यातून येथिल काँग्रेसला प्रचंड मरगळ आली होती.मात्र गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी मोठ्या निष्ठेने काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू ठेवली होती.राज्यात आकारास आलेल्या महाविकास आघाडीतील जागावाटपात शिरोळची जागा उद्धवसेना कि काँग्रेसला जाणार याबाबत गेले पंधरा दिवस प्रचंड उत्सुकता होती. ही जागा आता काँग्रेसला सुटल्याने दहा वर्षानंतर येथिल विधानसभा निवडणूकीत मतपत्रिकेवर हात चिन्ह पुन्हा दिसणार आहे.
— महत्वाची चौकट —
२०१९ च्या निवडणूकीत डॉ राजेंद्र पाटील २७८२४ इतक्या मताधिक्याने विजयी झाले असले तरी दुसऱ्या क्रमांकाची ६२२१४ इतकी मते शिवसेनेचे उल्हास पाटील यांनी घेतली होती. हे पहाता यावेळी ते कोणती भूमिका घेतात हे महत्वाचे असणार आहे. ते आघाडी धर्म पाळणार की सवता सुभा मांडणार यावरही निकालाची गणिते अवलंबून असणार आहेत.गतवेळी स्वाभिमानीचे उमेदवार सावकर मादनाईक यांनी ५१८०४ इतकी लक्षवेधी मते घेतली होती.तर विजयी झालेल्या यड्रावकरांनी घेतलेल्या २७८२४ या मताधिक्यापेक्षा जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारासह अन्य सहा उमेदवारांनी २८७५५ एकूण मते घेतली होती.म्हणजेच यड्रावकरांच्या विजयासाठी या सहा उमेदवारांचे मोठे सहकार्य झाले होते.सध्या उल्हास पाटील स्वाभिमानीत घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत.तसे झाले तर गतवेळच्या सावकर मादनाईक व उल्हास पाटील यांच्या मतांची बेरीज दोन्ही साखर सम्राट पाटलांची डोकेदुखी ठरू शकते.