शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ पोलीस ठाण्यातील सर्वच गावात मटका, लॉजिग,हातभट्टीची दारू वाहतुक व दारू विक्री,रात्री चोरून तीन पाणी क्लब असे अवैध धंदे जोम्यात सुरू आहे.याकडे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष देणार का?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित होत आहे.
शिरोळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कल्पना नसताना अनेक कर्मचारी वरकमाई मिळवण्यासाठी नामी शक्कल लढवून वारेमाप पैसे उकळत आहेत अशी जोरदार चर्चा शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावात सुरु आहे.गावातील खबऱ्याकरवी सावज शोधायचं आणि कारवाई करत असल्याचे षडयंत्र रचायचे त्या कारवाईत तोडपाणी करायची मिळेल ती रक्कम खिशात घालायची पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद न करता निघूनच जायचं असे प्रकार वारंवार घडत आहे.दरम्यान चार दिवसांपूर्वी शिरोळ जयसिंगपूर मार्गावर एका चौकात व चिंचवाड रस्त्यावरही बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या इसमांकडून रक्कम उकळली आहे.कारवाई जरी गोपनीय केली असली तरी पैसे पोलीस कर्मचाऱ्यांने घेतल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे.शासनाकडून गलेलठ्ठ पगार मिळत असताना सुद्धा केवळ आपली दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी यासाठी दबंग स्टाईलने सावज शोधून कारवाईचा फार्स करून केस करतो म्हणायचे नाहीतर पैसे द्यावे लागतील असे सांगून पैसे अनेकांकडून उकळून आपला खिसा गरम करून तोडपाणी करण्याचा उद्योग जोरात सुरू केला.नांदणी,शिरोळ,नृसिंहवाडी, जांभळी,टाकवडे,मौजे आगर,औद्योगिक वसाहत अवैध देशी दारूचे बॉक्स ठेवून विकत असल्याने दारुमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.हि दारू पिऊन काहीजण पत्नी व मुलांना मारहाण करत आहेत तर काही जण गावात,भर रस्त्यात धिंगाणा घालत आहेत.दारू कुठे व कशी मिळते हे गावातील महिला व लहान मुलांनाही माहिती आहे मात्र पोलीस व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कसे दिसत नाही.हा अवैध दारू विक्रीचा गोरख धंदा अर्थपूर्ण संबंधामुळे राजरोस चालू असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.अवैध दारू अनेक गावांमध्ये उघड्यावर मिळत आहे.मात्र या बाबींकडे इचलकरंजी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी,ठाणे प्रमुख व बीट अमलदार यांचे याकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याने जिल्हा पोलिस प्रमुख यांनी लक्ष घालावे अशी मागणी महीला व सर्व सामान्य नागरिकांतून होत आहे.तर या अवैध धंद्याल पाठबळ देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत जिल्हापोलिस प्रमुख महेंद्र पंडित,उपविभागीय अधिकारी रोहिणी सोंळके,शिरोळ पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शिवाजीराव गायकवाड यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी करून पोटपाण्यासाठी व्यवसाय करणाऱ्या अनेकांना पोलीस हे जनतेचे भक्षक नाहीत तर रक्षक आहेत याचा विश्वास निर्माण करून द्यावा अशी माफक अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
प्रत्येक चौकात ओपन मटक्याची व देशी दारूची दुकाने
शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावात मटक्याची दुकाने व देशी दारूची विक्री होत असताना पोलीस अधिकारी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बघत असल्याने नागरिक व महिला वर्गातून शिरोळ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त होत आहे.