जयसिंगपूर/ अजित पवार
होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर झाली आहे.या पार्श्वभूमीवर शिरोळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कोण याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.तथापि शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी असलेले विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे येत्या 24 ऑक्टोबर रोजी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.यामध्ये आपण नव्याने स्थापन केलेल्या राजर्षी शाहू विकास आघाडी पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीस सामोरे जायचे की महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची हे कार्यकर्त्याची मते आजमावल्यावर स्पष्ट होणार आहे. यामुळे महायुतीचा त्यांना पाठिंबाच राहणार आहे.शिरोळ तालुका हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला या मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने स्व.रत्नाप्पाण्णा कुंभार,स्व.आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील, श्रीमती सरोजिनी खंजिरे यांनी दीर्घकाल प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या मतदारसंघावर पकड निर्माण केली. पण 2014 च्या निवडणुकीत याच मतदारसंघातून शिवसेनेने उल्हास पाटील यांना निवडून आणले. यानंतर 2019 च्या निवडणुकीत अपक्ष असलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपला विजय खेचून आणला.आता होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे गेल्या पाच वर्षात शिवसेनेसोबत राहिले. यावेळी त्यांना पहिल्या अडीच वर्षात शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद ही मिळाले. यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ धरली. आणि त्यांनी आपल्या या पाच वर्षाच्या कालखंडात कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणून तालुक्याचा विकास साधला आहे.पण सध्याच्या या निवडणुकीत भाजपने 99 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात सांगली जिल्ह्यातील सांगली आणि मिरज तर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिण मध्ये भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. पण शिवसेना शिंदे गटाशी एकनिष्ठ असलेल्या शिवसेनेने अद्याप उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. यामुळे शेजारच्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झाले असले तरी अद्याप शिवसेनेने शिरोळ बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिवसेना शिंदे गटाशी एकनिष्ठ असल्याने त्यांच्याकडूनही याबाबत कोणती हालचाल होताना दिसून येत नाही.येत्या 24 तारखेला यड्रावकर यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा जयसिंगपूर येथील कोल्हापूर रस्त्यावरील यड्रावकर फार्म हाऊस येथे सकाळी नऊ वाजता संपन्न होणार आहे. या मेळाव्यात आमदार यड्रावकर यांनी नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राजर्षी शाहू विकास आघाडी पक्षाला मान्यता आणली आहे. या पक्षाच्या वतीने ते निवडणूक लढविणार काय? अथवा महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडणूक लढविणार का याकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु निवडणूक कशीही लढविली तरी महायुतीचा त्यांना पाठिंबाच राहणार आहे.