बरे झाले देवा…पानगळ झाली…आता स्वाभिमानीला नव्याने पालवी फुटण्याची अपेक्षा

Spread the love

बरे झाले देवा….पानगळ झाली…आता स्वाभिमानीला नव्याने पालवी फुटण्याची अपेक्षा  एक चिंतन

संभाजी जाधव / धरणगुती

गेल्या पंधरा विस वर्षात साखर कारखानदार ; भांडवलदार आणि प्रस्थापितांना आंदोलने आणि आपल्या उपद्रव मुल्यांने दे माय धरणी ठाय करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २०२४ च्या लोकसभा निवडणुकी पर्यंत पूर्णता राजकिय पानगळ झाल्याचे दिसून आले.शेतकरी आणि सामान्यांना आधार वाटणाऱ्या या संघटनेला आता नव्याने पालवी फुटावी अशी अपेक्षा आणि भावना सामान्य शेतकरी कष्टकरी वर्गातून व्यक्त होत आहेत

गेल्या १५ / २० वर्षात शेतकरी आणि सामान्यांच्या प्रश्नांवर केलेली आंदोलने ; आणि त्यातून केलेल्या राजकिय वाटचालीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खास . राजू शेट्टी यांनी घेतलेले कांही निर्णय मुळ शेतकरी चळवळीलाच मारक ठरले असले तरी त्याकाळी आंदोलनांच्या उपद्रव मुल्यांवर अल्पावधीत शिवार ते संसद असा गतिमान राजकिय प्रवास करणारे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शेतकरी नेते ठरले आहेत .
मात्र या राजकिय प्रवासात त्यांनी शेतकरी हितापेक्षा राजकिय महत्वाकांक्षेला प्राधान्य दिल्यानेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची वाताहत झाल्याचे आज शेतकऱ्यांतून बोलले जात आहे .ही वाताहत आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अस्तित्वाच्या सत्वपरीक्षेपर्यंत येऊन ठेपली आहे .
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या शेट्टींच्या नामुष्कीजनक पराभवानंतर आता विधानसभेची निवडणूक ही खुद्द राजू शेट्टी आणि त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी अस्तीत्वाची अंतिम परीक्षा ठरणार आहे . या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिरोळ विधानसभेच्या होमपिच वरूनच नव्याने सुरुवात करण्याची संधी आता स्वाभिमानीकडे आहे . स्वाभिमानीने आता जूनी जीर्ण धोरणे टाकून देण्याची गरज असल्याचे सामान्यांतून बोलले जात आहे . इतकी वर्षे शेतकरी चळवळीच्या आडून राजकारण केले . ते कांही काळ चालले .या काळात कांही निर्णय चुकीचे झाले . त्याचे परिणाम आता दिसत आहेत . जे झाले ते झाले . आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रयत्न करू नये . आता स्वतंत्र आणि तेवढीच उघड राजकिय भुमिका घेण्याची गरज आहे . राजकिय पक्ष ; भांडवलदार ; उद्योगपती ; सहकारी आणि खाजगी साखर कारखानदार ; हे सर्वच घटक सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून दुर आहेत . हीच बाब स्वाभिमानीच्या नव्याने पूर्नबांधणीसाठीची संधी आहे .या नव्याने बांधणीच्या काळात नवे शिलेदार शोधणे आणि नवे धोरण आखणे राबवणे स्वाभिमानीसाठी तितकेच महत्वाचे ठरणार आहे.गेल्या काही वर्षांत झालेल्या प्रचंड राजकिय उलथा पालथीत कोणत्याही राजकिय पक्षाच्या ;नेत्यांच्या वळचणीला न जाता स्वतंत्र विचारधारेने चालणारा एक मोठा मतदारवर्ग समाजात आहे . त्यात कष्टकरी शेतकरी शेतमजूर कामगार नोकरदार आणि बुद्धीवादीही आहेत.विद्यार्थी विद्यार्थीनी आहेत .महिला आहेत.बेरोजगार आहेत.अपक्ष कार्यकर्ते आहेत . यांचे प्रश्न कुणीही मांडताना दिसत नाहीत . आता नव्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देताना या वर्गालाही आता चांगलं नेतृत्व आणि एखाद्या संघटनेची गरज आहेच. स्वाभिमानीने प्रामाणिकपणे नव्याने बांधणी करण्याचे ठरवले तर हा वर्ग जोमाने स्वाभिमानी सोबत येऊ शकतो . सध्याच्या बजबजपूरीच्या राजकारण आणि समाजकारणात महिला भगिनी ;तरुणी यांच्या कतृत्व नेतृत्वाला दुदैवाने दुय्यम स्थान दिले जात आहे . संघटनेची नव्याने बांधणी करताना जागोजागी त्यांच्या पाठीशी राहून महिलांना नेतृत्वाची संधी दिल्यास महिला भगिनी मोठया संख्येने सहभागी होतील . जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघ असताना जिल्ह्यातील पुरुषप्रधान राजकारणात कोणत्याही राजकिय पक्षाला किमान पाच महिलांना विधानसभेची उमेदवारी द्यावी असे वाटले नाही . त्यादृष्टीने स्वाभिमानीने स्वबळावर जिल्हयातील राजकिय जय पराजयाचा विचार न करता किमान पाच महिला भगिनींना विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारीची संधी द्यावी .त्याची सुरवात शिरोळ विधानसभा मतदार संघातून व्हावी . स्वाभिमानीची २०२४ च्या लोकसभा निवडणूकी पर्यंत जी राजकिय पानगळ झाली आहे . ती पहाता बरे झाले देवा… आता नव्या विचाराने नव्या दमाने तिला स्वतंत्र निपक्ष सामान्य जनांच्या हिताची पालवी फुटावी अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नसावी.कारण राजू शेट्टींच्या नेतृत्वात तेव्हडी क्षमता नक्कीच आहे.

error: Content is protected !!