जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर येथील गीता परिवार शाखेच्या वतीने शुक्रवार दि.१८ ते रविवार दि.२० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे “श्री शिवप्रताप” या ओवीबद्ध शिवचरित्राचे तीन दिवसीय पारायण संपन्न होणार असल्याची माहिती आज गीता परिवार शाखेच्या वतीने आज सांगण्यात आले आहे. गीता परिवारचे संस्थापक पूज्य आचार्य गोविंद देव गिरी महाराजांची धार्मिक व्यासपीठावरुन श्रीरामायण, श्रीमहाभारत, श्रीभागवत यांसारख्या कथेप्रमाणे श्री शिवछत्रपतींची प्रेरणादायी मराठी शिवकथा नुकतीच सोलापूर शहरात संपन्न झाली.गेल्या दि. २१ सप्टेंबर रोजी याच व्यासपीठावरुन राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या माहेरचे म्हणजे सिंदखेडराजा येथील पाटील घराण्यातील श्रीशिवभक्त कै.श्री.म्हाळसाकांत पाटील रचित अत्यंत भक्तीपूर्ण अंत:करणाने व रसाळ प्रासादिक ओघवत्या शैलीने ओवीबद्ध अशा २१ अध्यायी रचना असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.सदरचा ग्रंथ हा चाळीस वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला असून नव्या संस्कारीत स्वरुपात श्रीशिवभक्तांना मिळावा.या हेतूने लेखकांचे नातू श्री योगेश पाटील यांनी हा ग्रंथ पूज्य श्री आचार्यजींना दाखवला त्यांना हा ग्रंथ सर्वार्थाने भावल्यामुळे पूज्य श्री आचार्यजींनी त्यांच्या ‘धर्मश्री’ प्रकाशनातर्फे हा ग्रंथ नव्याने प्रकाशित करण्याचा निर्णय घेवून महाराष्ट्रभर या पवित्र श्रीशिवचरित्राची एक लक्ष पारायणे व्हावीत अशी इच्छा ही व्यक्त केली आहे.याच अनुषंगाने गीता परिवार जयसिंगपूर शाखेच्या वतीने येत्या शुक्रवार दि.१८ ते रविवार दि. २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत श्री स्वामी समर्थ दरबार,गल्ली नं.५ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे “श्री शिवप्रताप” या ओवीबद्ध शिवचरित्राचे पारायण दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.अशी माहिती गीता परिवाराच्या प्रमुख श्रीमती प्रमिलादीदी माहेश्वरी यांनी दिली असून अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी विनय कदम ८४२१५७११११,अक्षय गायकवाड ९७६४४८०८१२, भगवंत जांभळे -९४०३५५१८१८ या क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.