शिरोळ दत्तचे 16 लाख मेट्रिक टन उस गाळपाचे उद्दिष्ट- अध्यक्ष रघुनाथ पाटील
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात १६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस दत्त कारखान्याला घालावा असे आवाहन चेअरमन रघुनाथ पाटील यांनी ५३ वा गळीत हंगाम बॉयलर प्रदीपन प्रसंगी केले.शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित जपण्याचे काम श्री दत्त कारखान्याने केले असून सर्वांना पुढे घेऊन जाण्याची दृष्टी ठेवली आहे.लवकरच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संस्था स्थापन करून मार्केटिंग आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही यावेळी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
प्रारंभी कारखाना चेअरमन रघुनाथ पाटील यांनी सपत्निक पूजा केली.तसेच मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी आणि बॉयलर प्रदीपन करण्यात आले.गणपतराव पाटील पुढे म्हणाले,शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याबरोबरच सेंद्रिय कर्ब वाढवून जमीन शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.पूरबुड क्षेत्रात उसापेक्षा भाजीपाल्याची दोन पिके घेतल्यास ऊसा इतके उत्पन्न शेतकरी घेऊ शकतात.या दृष्टीने कारखाना सध्या काम करीत आहे.भाजीपाला उत्पादकांनी एकत्र येऊन पूरबुड नुकसानीवर मार्ग काढू शकतात.सर्व ती मदत करण्यास कारखाना पुढे राहील.सरकारी नियमानुसार वेळेत बिल देणे आणि १६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यामध्ये कारखाना सक्षम आहे.कारखानदारी सक्षमपणे चालवण्याची आमची दृष्टी आहे.यासाठी शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला घालावा.यावेळी कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील आणि शेतकरी सभासदांनी दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी आभार मानले.यावेळी सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे सर्व विभागाचे खातेप्रमुख,पदाधिकारी, मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.