जयसिंगपुरातील 25 जण विशेष कार्यकारी अधिकारी
पालिका निवडणुकीत पत्ता साफ करण्यासाठी खेळी केल्याचा संशय..
जयसिंगपूर / अजित पवार
जयसिंगपूर पालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून राहिलेल्या संभाव्य उमेदवारांच्या ‘वाटेतील काटे संपता संपणात’ अशी अवस्था होऊन बसली आहे. जयसिंगपूर शहरातील 25 जणांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामध्ये पालिका निवडणुकीच्या इच्छुकांची संख्या अधिक असल्याने आगामी जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत पत्ता साफ करण्यासाठीच विशेष कार्यकारी अधिकारीपद देण्यात आले की काय? असा संशय व्यक्त होऊ लागला आहे. यातील काही सदस्य नगरसेवक पदाच्या इच्छुकांच्या यादीत आहेत.यादीतील सर्वांची या निमित्ताने निवडणुकीतून तिकिटे ‘कापली’ की काय? अशी कुजबुज संभाव्य उमेदवारांच्या गोटात सुरू झाली आहे.पालिका निवडणुकीचा कार्यकाल संपून सुमारे तीन वर्षाचा अवधी उलटला आहे.या निवडणुकीत आपण कोणत्याही परिस्थितीत बाजी मारायची असे स्वप्न उराशी बाळगून अनेकांनी तयारी केली आहे.प्रभागात ठाण मांडून बसलेल्या या संभाव्य उमेदवारांनी आपले पारडे कसे जड आहे.यासाठी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करून समाजकार्य सुरू केले आहे. पण निवडणुकांना दिवसेंदिवस वेळ होऊ लागल्यामुळे कार्यकर्ते सध्या नैराश्येतून जात आहेत.लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.या पार्श्वभूमीवर नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याकरिता अनेक पदांची ‘खैरात’ केली आहे.याचाच एकभाग म्हणून शिरोळ तालुक्यातील विविध गावातल्या 370 जणांच्या गळ्यात विशेष कार्यकारी अधिकारी पदांची माळ टाकली आहे.या यादीत जयसिंगपूर शहरातील सुमारे 25 जणांचा समावेश आहे.या अधिकारी पदामुळे अनेकांना सामाजिक कार्यात सक्रिय होण्याची उभारी मिळणार आहे.राज्य शासनाच्यावतीने विशेष कार्यकारी अधिकारी पदाची नेमणूक करण्यात आली आहे. यातील काही जण इच्छुकांच्या यादीत आहेत.या इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे.ऐनकेन प्रकारे आपण संपर्कात राहू यासाठी कार्यकर्त्यांचा समूह वाढवला आहे.वाढविलेला समूह संपर्कात रहावा याकरता या कार्यकर्त्यांना आर्थिक पाठबळ ही देण्यात आले आहे.पण या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नेमणुकीमुळे संभाव्य उमेदवार मात्र सध्या संभ्रमात पडले आहेत.या उमेदवारांनी केलेली जोरदार तयारी पाहता जयसिंगपूर शहरातील या विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झालेल्यातील काही सदस्य संभ्रमात आहेत. आगामी काळात होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीतून आपला ‘काटा’ दूर केला की काय? असा प्रश्न या उमेदवारांना भेडसावू लागला आहे. आपण या निवडणुकीपासून वंचित राहणार की काय ? गेल्या पाच वर्षापासून केलेल्या तयारीचं करायचं काय असा यक्षप्रश्न या संभाव्य उमेदवारांना पडला आहे.
महत्वाची चौकट
पंचवार्षिक निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या या संभाव्य उमेदवारांपैकी काही जणांना शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारीपदाची नियुक्तीपत्रे मिळाली आहेत. या नियुक्ती पत्रांमुळे आपण संभाव्य उमेदवारांच्या यादीतून बाद झालो की काय? असा प्रश्न या उमेदवारांसमोर उभा ठाकला आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात भरमसाठ केलेल्या खर्चाचे आता काय होणार.! त्याचे काय करायचे असा सवाल ही या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. तर मग आपल्याला नियुक्तीपत्रच नको अशी चर्चा दबक्या आवाजात संभाव्य उमेदवारांत सुरू झाल्याचे बोलले जात आहे.