आता पूर्वीचे साखर कारखानदार उरले नाही सभासदाच्यात खंत

Spread the love
दसरा,दिवाळी आली की शेतकरी वर्गाला आर्थिक चणचण जाणवत असते.कारण दादा… शंभरचे वरदान खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे कुटूंब हे शेतीवर आणि शेतीच्या पैशावर अवलंबून आहे.मुलाने जरी एखादी वस्तु मागितली तरी ऊसाचे पैसे आल्यावर देतो असे सहज उत्तर वडील देतात.त्याच पद्धतीने दिवाळी, दसऱ्याला
कारखाने काही दिली तर दिवाळी साजरी होणार हे ठरलेले आहे.शेतकरी संघटना आणि प्रतिनिधी या दृष्टीने मागणी करत असतात परंतु कारखानदार देतील असेच नाही.सहकारी साखर कारखान्यांची परीस्थिती ही आता फार चांगली आहे असे म्हणता येणार नाही.त्याला कारण या कारखान्यात काटकसर नाही, शेतकऱ्यांचे हित पाहिले जात नाही,सहकार महर्षि दत्ताजीराव कदम यांच्याकडे एक बारकी फियाट गाडी होती,त्यानी कोट्यावधी किमतीच्या गाडी कधीच वापरल्या नाहीत किंवा दे. भ.रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्याकडे असलेली मर्सिडीज गाडी ही टाटा कंपनीने दिली होती ती त्यांनी कंपनीच्या मालकीची केली.सहकार महर्षि डॉ. सा.रे.पाटील साहेब यांच्याकडील गाडी साधी होती,त्यांचा प्रवास रेल्वेचा होता.आता असे कारखानदार उरले नाही. लक्षावधीच्या आणि कोट्यावधीच्या गाड्या आहेत,बेहिशोबी सहकारी आहेत,कामगार आहेत,उत्पादनात काटकसर नाही त्यामुळे अनेक कारखाने बंद आहेत,अनेक भाड्याने दिले आहेत, मूळ संस्थापक आहे तो गेला की त्याचा उद्देशच संपतो आणि मग पुढची पिढी फार चांगली येत नाही.कारखाना उभा करताना झालेल्या यातना त्याना माहीत नसतात याचा परीणाम पुढची पिढी ही ऐशआरामात राहते. एसी हवा,भारी खुर्च्या हव्यात,भारी गाड्या हव्यात हा सगळा रुबाब सहकारी पैशावर असतो त्यातून कारखाने मेटाकुटीला येतात.श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने आणि त्याचे चेअरमन गणपतरावदादा पाटील यांच्या बाबतीत विचार करावयाचा गेल्यास राष्ट्रसेवा दलाचे झालेले संस्कार,काटकसर आणि शेतकऱ्यांचे हित याची फार मोठी काळजी गणपतरावदादाना सातत्याने आहे
आणि म्हणूनच या सगळ्या परीसरातील शेतक-याला गणपतरावदादा पाटलानी मागील गळीत हंगामाचे अतिरीकत शंभर रुपये देणार म्हटल्यानंतर प्रचंड आनंद झाला. हा आनंद गगनात मावत नाही.गरीब शेतकऱ्याला आपली काळजी नसते,घरादाराची काळजी जास्त असते. दिवाळीच्या सुमाराला बायकोला लुगडे घेता येईल काय,मुलाना कपडे घेता येईल काय,फराळाचे सामान चांगल्या पद्धतीने आणता येईल काय,तेलाची भयंकर महागाई, इतर वस्तूचे वाढलेले दर या परीस्थितीत खिशात पैसा नसताना उधार उसनवार करता येईल काय या चिंतेत तो राहिलेला असतो.कुटूंबाची जबाबदारी त्याच्या डोक्यात फार असते, शेजारच्या घरातील दिवाळी चांगली होत असताना आपल्या घरावर एखादा आकाश कंदील लावता येईल काय,दिवाळीचे चारी दिवस व्यवस्थित फराळ करता येईल की नाही, भाऊबीजेला बहीणीकडे जाता येईल की नाही, पाडव्याच्या दिवशी घरी ओवाळणी घालता येईल काय अशा अनेक चिंता असतात.
सण म्हटला की खरा विचार हा कुटूंब प्रमुखावर असतो.जो कुटूंब प्रमुख दारु पित नाही,आकडा खेळत नाही,जुगार खेळत नाही,कुटूंबाची जाणीव आहे,जो प्रापंचिक आहे अशा।कुटूंब प्रमुख शेतकऱ्याला सातत्याने घराची काळजी असते.मोटरगाडी आपल्याकडे नाही पण बैलागडी रंगवता येईल काय,बैलाला नवीन काही घेता येईल काय,रानातील छप्पर बांधता येईल काय अशा अनेक अडचणी असतात. आणि या सगळ्या अडचणीवर ऊसाचा दर हा एक जबरदस्त उपाय असतो.कारखानदार हे निगरघट्ट आहेत, त्याना गरीब सभासदाचे काही
वाटत नाही.प्रचंड इमारतीत आलिशान ऑफिसमध्ये सिक्युरिटीच्या विळख्यात ते आरामात असतात.वंश परंपरागत चेअरमनकी त्यांच्या घरात असते.आजोबा झाले,वडील झाले आता मी चेअरमन होणार,पैशाचा हिशोब त्याला कधीच नसतो.मॅनेजींग डायरेक्टर, अकौंटंट ही सगळी ऐकणारी असतात,पैसा कसा मिळवायचा आणि कसा चेअरमनला द्यायचा याची ट्रीप त्याना माहीत असते, ते चेअरमनला खूष ठेवतात.झाडालाही सावली आणि फळालाही सावली त्यामुळे ही पुढची पिढी चैनीत आहे.संध्याकाळी ते रंगीत औषध घेतात,चांगल्या बारमध्ये बसतात नसेल तर घरच्या बंगल्यात सगळीच सोय केलेली असते. शेतकरी मात्र ऑक्टोबर हिट झाली,पाण्याचे काय,पाणी नियमित मिळणार काय,लावण करायची की भांगलण करायची की ऊसाची नवी मशागत करायची या तो चिंतेत असतो, गडी मिळत नाही,नवीन मशिनरीला नंबर आहे अशा सगळ्या परीस्थितीत उत्पादन वाढवणे गरजेचे आहे तो तीपण चिंता करत असतो.आणि या चिंतेत तो झुरत असतो.आमच्या नेत्यानी दिवाळीच्यावेळा पैसा मिळाला पाहिजे अशी मागणी केली,तगादा लावला पण महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी नेत्याने शंभर रुपये जाहीर केले.मागील गळीत हंगाममधील ऊसाचा हा अतिरीक्त दर आहे.दसऱ्याच्या पुर्वी हे पैसे
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. उद्यान पंडीत गणपतरावदादानी केलेली ही घोषणा प्रचंड आनंदाची आहे.इतका आनंद सभासदाना कधीही होणार नाही. २०२२-२३ च्या ऊसासाठी हा अतिरीक्त दर आहे आणि तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.ही घोषणा केल्याबरोबर तमाम कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्याना प्रचंड मोठा आनंद झाला आहे.यासाठी हा प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.ही मंजुरी त्याना द्यावीच लागेल. गणपतरावदादानी याबरोबरच सर्वाना आवाहनही केले आहे की २०२२-२३ च्या ज्या कारखान्यानी तीन हजारपेक्षा कमी दर दिला आहे त्यानी शंभर रुपये जादा देणे हे गरजेचे आहे, त्यानी हे आवाहन केले आहे त्याप्रमाणे इतरानीसुद्धा हा निधी तातडीने द्यावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.सगळेजणच लगेच देतील असे वाटत नाही,परीस्थिती असो अगर नसो हा पैसा देणे गरजेचे आहे.परंतु काही कारखाने शेतकऱ्यांची काळजी करतात असेच नाही.शेतकऱ्यांची काळजी नसलेलेही बरेच आहेत.अशा कारखानदारानी शेतकऱ्यांचा विचार करुन गणपतरावदादांचा विचार सर्वत्र पसरावावा अशी त्याना विनंती आहे.शेवटी…सहकारी साखर कारखानदार हा शेतकऱ्याचा कणा आहे.दूधाचा व्यवसाय आहे
पण तो मर्यादित असतो.त्याबाबतीतही आता  भांडवलदारी सुरु झाली,भगिनी वर्ग मोठ्या कष्टाने जनावरांचे संगोपण करतात पण दर मिळेल असे वाटत नाही.हा पैसा घराला उपयोगी होतो असे नाही. भाजीपाला,इतर किरकोळ खरेदी,मुलांचा खाऊ,किरकोळ औषध या सर्वासाठी ज्या पैशाची गरज असते त्या पैशाची उपलब्धता या दूधाच्या पैशातून होते. पण पशुखाद्यसुद्धा आता वाढले, वैरणीचे दर वाढले याचाही विचार करणे गरजेचे आहे. अशाही परीस्थितीत पहिल्यांदा शंभर रुपये जाहीर केल्याबद्दल गणपतरावदादा बळीराजाचे तुम्हाला वरदान मिळेल, शेतकरी कुटूंबाचा आशिर्वाद मिळेल,शेतकऱ्यांची दसरा दिवाळी फार मोठी नसेल पण गोड पोळी करणे चांगले असेल हे निश्चीत हे विचाराचे धन इतर कारखानादाराना मिळूदे आणि त्यानाही हे शंभर रुपये देण्याची बुद्धी व्हावी ही देवाचरणी प्रार्थना.
error: Content is protected !!