करणी काढून देण्याची बतावणी करून ८४ लाखाची फसवणूक

Spread the love
घरासह कुटुंबीयांवर केलेली करणी आणि काळी जादू काढण्याची बतावणी करीत कोल्हापूर येथील गंगावेस परिसरात राहणाऱ्या शेतकरी वृद्धाला ८४ लाख ६९ हजाराला गंडा घालून पोबारा केलेल्या भोंदूबाबा टोळीतील दोन साथीदारांना जुना राजवाडा पोलिसांनी शनिवारी पहाटे बेड्या ठोकल्या.शशिकांत नीळकंठ गोळे (वय ६९ रा. वडगाव निंबाळकर, बारामती, जि. पुणे) व कुंडलिक शंकर झगडे (३८, जेजुरी, पुणे) अशी त्यांची नावे आहेत.न्यायालयाने संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.मुख्य फरार संशयित दादा पाटील महाराज (पाटणकर),अण्णा ऊर्फ नित्यानंद नारायण नायक, सोनाली पाटील ऊर्फ धनश्री गणपत काळभोर यांच्या अटकेसाठी जुना राजवाडा पोलिसांनी पथके रत्नागिरी,सिंधुदुर्ग तसेच पुणे जिल्ह्यात रवाना झाली आहेत.एक-दोन दिवसांत भोंदूबाबा टोळीतील म्होरक्यासह संशयितांना जेरबंद करण्यात येईल,असे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे,उपनिरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले.कोल्हापूर येथील सुभाष हरी कुलकर्णी (७७, रा.दत्त गल्ली, गंगावेस ) या वृद्ध शेतकऱ्याला टोळीने काळी जादू व कुटुंबीयावरील करणी काढून देण्याची बतावणी करून ८४ लाख ६९ हजारांची फसवणूक केली आहे.दि.१३ फेब्रुवारी २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२४ या काळात गंगावेस व कणकवली, कसाल (जि.सिंधुदुर्ग) येथे ही फसवणुकीची घटना घडली आहे.
error: Content is protected !!