“या” सहा मतदारसंघात दिग्गज रिंगणात उतरणार…

Spread the love

हातकलंगलेतील या सहा मतदारसंघात दिग्गज रिंगणात उतरणार..

जयसिंगपूर/ अजित पवार

हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात दिग्गजांची मांदियाळी झाली आहे. शिरोळ, इचलकरंजी, हातकलंगले, पन्हाळा- शाहूवाडी, शिराळा, आणि वाळवा या मतदारसंघातील जनता महाविकास आघाडी अथवा महायुतीला साथ देणार का अपक्षांकडे झुकते माप टाकणार याकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

 

 

विधानसभेचा काही दिवसात बिगुल वाजेल असे बोलले जात आहे. यामुळे शिरोळ, इचलकरंजी, हातकलंगले, पन्हाळा- शाहूवाडी, शिराळा, वाळवा या हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विद्यमानांना शह देण्याकरता अनेक जणांनी कंबर कसली आहे.शिरोळ मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना माजी आमदार,स्व.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांचे पुत्र गणपतराव पाटील हे विरोधी उमेदवार असणार आहेत.त्यातच राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार कोण? हे अजून गुलदस्त्यातच आहे.तर माजी आमदार उल्हास पाटील निवडणूक रिंगणात उतरणार हे स्पष्ट आहे. यामुळे ही लढत रंगतदार होईल असे बोलले जात आहे.

 

 

 

 

इचलकरंजी मतदारसंघात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे पुत्र आणि माजीमंत्री प्रकाश आवाडे हे सध्याचे आमदार आहेत. आमदार आवाडे यांनी आपले पुत्र राहुल आवाडे यांना या निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना शह देण्यासाठी मदन कारंडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. त्यातच खासदार धैर्यशील माने यांचे कट्टर समर्थक असलेले रवींद्र माने हे या मतदारसंघात तयारी करत आहेत.

 

 

 

 

हातकलंगले मतदारसंघ हा पूर्वाश्रमीचा वडगाव राखीव मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाचे माजीमंत्री आणि माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी बरेच वर्षे प्रतिनिधित्व केले. सद्या त्यांचे पुत्र राजूबाबा आवळे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. माजी आमदार सुजित मिणचेकर आणि गेल्या पाच वर्षापासून जनसुराज्य पक्षाच्यावतीने मतदारसंघ पिंजून काढलेल्या अशोक माने यांच्यातील लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

शाहुवाडी- पन्हाळा मतदारसंघात उबाठा गटाचे माजी आमदार सत्यजितआबा पाटील- सरूडकर आणि आमदार विनय कोरे यांच्यात सामना रंगतदार होईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे. शिराळा मतदारसंघात स्व. शिवाजीराव देशमुख यांनी बरेच वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांच्यानंतर शिवाजीराव नाईक यांनी केले. विद्यमान आम. मानसिंगराव नाईक सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. हे दोन्ही नेते शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीशी संलग्न आहेत. या मतदार संघात महाडिक गटाकडून कोण उमेदवार निश्चित केला जातो याकडे या मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

 

तर वाळवा मतदारसंघात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजीमंत्री जयंत पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत.त्यांना हुतात्मा उद्योग समूहाचे वैभवकाका नायकवडी आणि भाजपचे निशिकांत पाटील यांच्याशी सामना करावा लागू शकतो असे बोलले जात आहे.याच मतदारसंघात मिरज पश्चिम भागातील बऱ्याच गावांचा समावेश आहे.यामुळे येथे कोणाचे प्राबल्य चालेल याकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. एकंदरीतच हातकलंगले लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारते याकडे आता जनतेने लक्ष केंद्रित केले आहे.

error: Content is protected !!