भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संस्था स्थापनेसाठी दत्त पुढाकार घेणार – गणपतराव पाटील

Spread the love

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संस्था स्थापनेसाठी दत्त पुढाकार घेणार

उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची ग्वाही

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ तालुका आणि परिसरामध्ये प्रत्येक वर्षी पूर परिस्थिती निर्माण होते.यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होते.हे नुकसान काही अंशी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. तसेच या भाजीपाल्याला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शिरोळ तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संस्था स्थापन करण्यामध्ये श्री दत्त कारखाना पुढाकार घेत आहे.यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास आपण तयार आहोत,अशी ग्वाही उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.

 

 

 

 

श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर शिरोळ तालुका व परिसरातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची ‘संवाद सभा’ आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते.गणपतराव पाटील पुढे म्हणाले श्री दत्त कारखान्याच्या विस्तारीकरणानंतर जादा गाळपासाठी जादा उसाची आवश्यकता आहे.पण नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

 

 

 

 

या नुकसानीवर उपाययोजना करण्यासाठी आणि निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन करून त्याला बाजारपेठ मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी मिळून एकजुटीने संस्था स्थापन करणे आवश्यक आहे.या संस्थेच्या माध्यमातून शेती तज्ञांशी चर्चा करून आपल्या समोरील अडचणी सोडवून उत्पादन वाढीबरोबरच विक्री व्यवस्थाही निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.आत्तापर्यंत श्री दत्त कारखान्याने शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवूनच काम केले आहे.

 

 

 

 

आगामी काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचीही आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी सामूहिकरित्या प्रयत्न करण्यामध्ये आम्ही पुढाकार घेत आहोत.याला सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी केले.प्रारंभी मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये मार्केटिंग आणि निर्यात करण्यासंबंधी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील पर्याय याचा आढावा घेतला.

 

 

 

 

यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून बाजारपेठ निर्माण करण्याबरोबरच आपल्या समोर येणाऱ्या अनेक अडचणींचा उहापोह केला.तसेच वर्षभरामध्ये योग्य नियोजन करून भाजीपाला घेतल्यास सर्व भाजीपाला उत्पादन शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. यासाठी गणपतराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

 

 

 

 

 

यावेळी ट्रस्टचे संचालक अंबादास नानिवडेकर,माती परीक्षण अधिकारी ए.एस.पाटील,ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले,शरद पाटील यांच्यासह शेती खात्याचे अधिकारी,मदतनीस व शिरोळ,हातकणंगले तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!