स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची २३ वी ऊस परिषद २५ ऑक्टोबर रोजी येथील विक्रमसिंह मैदानावर होणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथे घेण्यात आलेल्या कार्यकत्याच्या मेळाव्यात केली.या मेळाव्याला सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेतील ऊस दराकडे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.गेल्या २२ वर्षांपासून जयसिंगपूर येथे ऊस परिषद होते.यामध्ये जाहीर केलेला दर मिळण्यासाठी संघटना टोकाचा संघर्ष करीत असते.या परिषदेला सांगली, कोल्हापूर,साताऱ्यासह महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील शेतकरी हजेरी लावून दरासाठीच्या पुढील लढ्याला सज्ज होतात.यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्येच परिषद होणार आहे.पण यापूर्वीच्या चार ऊस परिषदा आचारसंहितेमध्येच झाल्या आहेत. त्यामुळे ऊस परिषदेला आचारसंहितेचा काहीही अडथळा येणार नाही.यंदाची ऊस परिषदही मोठ्या ताकदीनेच घेतली जाईल.असे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजच्या बैठकीत केले.