शिरोळ विधानसभेसाठी जनतेने गणपतराव दादांना साथ द्यावी – युवा नेते रोहित पाटील
जयसिंगपूरात डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फौंडेशन आयोजित रास दांडिया गरबा स्पर्धेस उत्साहात प्रारंभ
जयसिंगपूर / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्याचे माजी आ. स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या आदर्श विचारांचा वारसा जोपासत श्री दत्त उद्योग समुहाचे प्रमुख, सहकारमहर्षी गणपतराव दादा पाटील यांनी सर्व सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.या परिसरातील क्षारपड झालेली जमिन सुपीक करून शेतकर्यांना दिलासा देण्याचे काम त्यांच्या हातून घडत आहे. अशा कर्तबगार नेतृत्वाला येणार्या विधानसभा निवडणुकीत शिरोळ तालुक्याचे आमदार म्हणून काम करण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित आर. पाटील यांनी केले.
येथील मालू ग्राऊंडमध्ये डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फौंडेशन आयोजित भव्य रास दांडिया गरबा स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी युवा नेते रोहित पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी गणपतराव पाटील होते. सिनेअभिनेत्री अमृता धोंगडे या प्रमुख पाहूण्या म्हणून उपस्थित होत्या.जयसिंगपूर शहरातील प्रमुख मार्गावरून प्रमुख मान्यवरांची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व रास दांडिया गरबा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना युवा नेते रोहित पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. (आबा) पाटील आणि शिरोळ तालुक्याचे माजी आ. स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते. दुसर्या पिढीनेही हे ऋणानुबंध कायम ठेवले आहेत. गणपतराव पाटील यांनी आपल्या कार्यातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे.
दत्त उद्योग समुहाच्या माध्यमातून शेतकर्यांचे हित जपले आहे. देशाला आदर्शवत ठरलेला क्षारपडमुक्त जमिन प्रकल्प राबवून शेतकर्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. असा कर्तबगार नेता विधीमंडळात असणे गरजेचे आहे. याकरिता शिरोळ तालुक्यातील जनतेने येणार्या विधानसभा निवडणुकीत गणपतराव पाटील यांना खंबीर साथ द्यावी.
जयसिंगपूर नगरीची एक वेगळी ओळख आहे. हे शहर मॉडेल शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात रास दांडिया गरबा स्पर्धा घेवून सांस्कृतिक व्यासपीठाला चालना देण्याचे काम डॉ. सा. रे. पाटील सोशल फौंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे. अशाच पध्दतीच्या स्पर्धा पुढील वर्षी निश्चितपणे तासगाव व कवठेमहांकाळ येथे घेतल्या जातील. या स्पर्धेचा शुभारंभ करण्याकरिता आमदार म्हणून गणपतराव पाटील यांना मी आजच निमंत्रण देत आहे.
त्यांना आमदार करण्यासाठी सर्वांनीच पाठबळ द्यावे.
या समारंभाचे अध्यक्ष सहकारमहर्षी गणपतराव पाटील म्हणाले, डॉ. सा. रे. पाटील सोशल फौंडेशनने जयसिंगपूर शहरात विविध उपक्रम राबविले आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याकरिता रास दांडिया गरबा स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पधॅेच्या माध्यमातून शहराचा नावलौकिक होणार आहे. युवा नेते रोहित पाटील यांच्यासारखा कर्तबगार युवा नेता हा महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी आमदार म्हणून असणे ही काळाची गरज आहे.
त्यांना आमदार करण्यासाठी आमच्या गटाचे सर्व कार्यकर्ते व मी स्वत: प्रयत्नशील असणार आहे. येणार्या निवडणुकीत रोहित पाटील यांना निश्चितपणे विजयाचा गुलाल लागेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. तसेच डॉ. सा. रे. पाटील सोशल फौंडेशनच्या माध्यमातून लोकोपयोगी उपक्रम राबवून स्व. सा. रे. पाटील यांच्या आदर्श विचारांची जोपासना यापुढीलही काळात केली जाईल.
सिनेअभिनेत्री अमृता धोंगडे म्हणाल्या, जयसिंगपूरवासियांनी आमचे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. या स्वागताने मी भारावून गेले आहे. सहकारमहर्षी गणपतराव पाटील व युवा नेते रोहित पाटील यांचे कार्य समाजाला दिशादर्शक आहे. त्यांनी यापुढेही समाजहितासाठी कार्यरत रहावे.स्व. डॉ. सा. रे. पाटील सोशल फौंडेशनने रास दांडिया गरबा स्पर्धेचे आयोजन करून नवरात्रोत्सवाच्या काळात वेगळे व्यासपीठ निर्माण केले आहे. या स्पर्धेला माझ्या शुभेच्छा आहेत.
जयसिंगपूरचे माजी नगरसेवक व उद्योगपती अशोकराव कोळेकर म्हणाले,आमचे नेते, सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांनी स्व. डॉ. सा. रे. पाटील यांच्या विचारांची जोपासना करीत असताना श्री दत्त उद्योग समुहाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागातील १० हजार एकर जमिन क्षारपडमुक्त करून शेतकर्यांच्या जीवनात आर्थिक नंदनवन फुलविण्याचे कार्य केले आहे.
श्री दत्त साखर कारखान्याच्या दत्त क्षारपडमुक्त पॅटर्नला देशपातळीवरचे पेटंट मिळाले असल्यामुळे शेतकर्यांची नापीक जमिन सुपीक करण्याकरिता दत्तच्या क्षारपडमुक्त जमिन प्रकल्पाचा उपयोग देशातील शेतकर्यांना होणार आहे,ही बाब गौरवास्पद आहे.दत्त उद्योग समुहाबरोबरच डॉ.सा.रे.पाटील जयसिंगपूर -उदगांव सह.बँक व डॉ. सा. रे.पाटील सोशल फौंडेशनच्या माध्यमातून लोकोपयोगी काम सुरू आहे.
गणपतराव पाटील यांनी केलेल्या कामाच्या बळावरच येणार्या विधानसभेला आम्ही सामोरे जाणार आहोत. शिरोळ तालुक्यातील जनता गणपतराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यामुळे निश्चितपणे गणपतराव दादा पाटील हे आमदार होतील, असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.
जयसिंगपूरचे उद्योगपती विनोद घोडावत, राजेंद्र मालू यांनीही मनोगत व्यक्त करून सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांचे कार्य समाजाला आदर्शवत असल्याचे सांगून डॉ. सा. रे. पाटील सोशल फौंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रास दांडिया गरबा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.स्वागत व प्रास्ताविक माजी नगरसेवक सर्जेराव पवार यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी दत्त साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक शेखर पाटील, महेंद्र बागे, युवा नेते वरूण पाटील, वरद पाटील, जयसिंगपूर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अमरसिंह निकम, दत्त ग्राहक भांडारच्या व्हा. चेअरमन सौ. अनिता कोळेकर, माजी नगरसेवक मुसा डांगे, युनूस डांगे, संजय पाटील-कोथळीकर, उद्योगपती दिलीप पाटील-कोथळीकर, राजू कोळेकर,
नाट्यनिर्माते निशिकांत घाटगे, दत्तात्रय पिसाळ, उद्योगपती जोतीराम जाधव, प्रसाद उर्फ नाना हेगिस्टे, सुरेश माणगावे, अर्जुन हजारे, रघुनाथ देशिंगे, अक्षय पाटील, सामाजिक कार्यकर्त्या साजिदा घोरी, सामाजिक कार्यकर्ते विजय माणगांवे, इकबाल सुतार, रंगराव पवार, संजय चौगुले, सागर म्हेतर, अमोल धुमाळ, वीरेंद्रसिंह निकम, अशोक घोरपडे, अमित पाटील,
राजू घोरी यांच्यासह स्व. डॉ. सा. रे. पाटील सोशल फौंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार चंद्रकांत जाधव-घुणकीकर यांनी मानले.