शिरोळमध्ये श्री दुर्गामाता दौडच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा जपण्याचा संकल्प
दौंडमध्ये ज्येष्ठांबरोबर हजारो तरुण तरुणींचा सहभाग
शिरोळ / प्रतिनिधी
नवरात्र उत्सवाच्या काळात श्री. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान यांच्यावतीने प्रतीवर्षाप्रमाणे श्री. दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. यावर्षी शिरोळमधील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाच्या पदाधिकारी व धारकऱ्यांनी एक आगळं वेगळं नियोजन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे अठरापगड जाती ना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली होती.त्याची आठवण आजच्या तरुण पिढीला व्हावी. यासाठी शिरोळमधील सर्व समाजाला एक दिवस श्री. दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करण्याचा मान दिला . येथील अनुसूचित जमातीच्या कोळी बांधवांना मान देऊन तरुणांना स्फूर्ती व प्रेरणा देण्याचे अलौकिक कार्य केले तसेच या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा जपण्याचा संकल्पही केला.शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने प्रति वर्षाप्रमाणे घटस्थापनेच्या दिवसापासूनच श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन केले जाते. शिरोळ शहरात श्री दुर्गामाता दौडमध्ये परिसरातील ज्येष्ठ नागरिकांबरोबरच हजारो तरुण-तरुणींचा सहभाग आहे. पहाटेच्या वेळी निघणाऱ्या या श्री दुर्गामाता दौडमध्ये जय भवानी जय शिवाजी अंबा माता की जय दुर्गा माता की जय या घोषणा देत छत्रपती शिवरायांचा प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र म्हणत विविध स्फूर्ती गीत गात शहरातील प्रत्येक भागात एक दिवस श्री दुर्गामाता दौड जात आहे.या श्री दुर्गामाता दौडचे स्वागत परिसरातील नागरिक अमाप उत्साहात करीत आहेत. रस्त्यावर रांगोळी घालून ध्वज पूजन आणि फुलांचा वर्षाव करीत श्री दुर्गामाता दौडचे स्वागत करण्यात येत आहे.श्री दुर्गामाता दौडच्या निमित्ताने यावर्षी शिरोळमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा जपण्याचा संकल्प करीत शहरातील विविध जाती धर्मास एक दिवस श्री दुर्गामाता दौडमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊन त्या समाजाच्या हस्ते ध्वज पूजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे पूजन श्री दुर्गा माता आरतीचा मान दिला जात आहे. यामुळे प्रत्येक समाजातील जेष्ठ नागरिक व तरुण या दुर्गामाता दौंडमध्ये सहभागी होत आहेत शहरातील ब्राह्मण,कोळी,लिंगायत,जैन,नाभिक,चर्मकार,कोरवी,बौद्ध व मातंग या समाजास एक एक दिवस शिवतीर्थ पूजनाचा मान देण्यात आला आहे या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल शिरोळमधील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकारी व धारकऱ्यांचे कौतुक होत आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई आणि शिरोळ तालुकाध्यक्ष प्रवीण चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील प्रत्येक शहरात आणि गावात श्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.यामुळे प्रत्येक शहर आणि गावात शिवमय व भगवे वातावरण निर्माण होऊन श्री दुर्गा देवीचा गजर होत आहे.