कोळी जमातीच्या संविधान हक्कासाठीचे आमरण उपोषणाच्या
नवव्या दिवशी पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थगित
प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव यांची तब्येत ढासळली
जिल्हा परिषद सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे सुरु असलेल्या सकल कोळी महादेव, मल्हार,टोकरे,ढोर कोळी जमातीच्या संविधान हक्कासाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणाच्या नवव्या दिवशी उपोषणार्थी प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव यांची तब्येत ढासळली.प्रकृती नाजूक झाल्याने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने दखल न घेतल्याने जमात बांधवांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.याचा फटका आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसणार आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी जमात बांधवांनी आपापल्या गावात,शहरात आपली ताकद दाखवून विविध प्रकारची आंदोलने करून निद्रीस्तपणाचे सोंग घेतलेल्या शासनास जागे करायची वेळ असल्याची संतप्त भावना जमातबांधवांत निर्माण झाली होती.दरम्यान सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी उपोषणस्थळी येवून चर्चा केली.मुख्यमंत्र्यांच्यासमवेत लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले. कोळी जमातीला कोणत्याही जाचक अटी व शर्ती शिवाय जमात प्रमाणपत्र मिळावे. ही मुख्यमागणी आहे.सोलापूरचे पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांचे हस्ते ज्यूस पिवून उपोषण सोडण्यात आले.दरम्यान पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द जर पाळला नाही तर सोलापूरात आंदोलन न करता मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा कोळी जमातीने दिलेला आहे.दि.२५ सप्टेंबर २०२४ पासून पुनम गेट,जिल्हा परिषद सोलापूर येथे कोळी महादेव, मल्हार, टोकरे,ढोर कोळी जमातीच्या संविधान संविधानिक व न्याय हक्कासाठी बाळासाहेब बळवंतराव,दत्ता सुरवसे, अभिमान घंटे, सूरज खडाखडे व माशाप्पा कोळी हे पाच जमात बांधव अन्नत्याग उपोषण करीत होते.गेल्या नऊ दिवसापासून महाराष्ट्रातील विविध भागातून पाठींबा दर्शविण्यासाठी बहुसंख्य जमात बांधव येत होते. परिस्थिती चिघळण्याची शक्यता होती.घटनेची तीव्रता लक्षात घेवून प्रशासनाने उपोषण स्थगित करण्यात यश मिळविले.