लधरणगुत्तीला ‘माझी वसुंधरा अभियान- चार’ मध्ये राज्यस्तरीय उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक
शिरोळ / प्रतिनिधी
राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान- चार’ मध्ये राज्यस्तरीय उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक धरणगुत्ती (जिल्हा कोल्हापूर) गावास जाहीर झाला असून 75 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. या निमित्ताने श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर सहकार महर्षी, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील गाव विकासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.पृथ्वी,वायू,जल,अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर 2020 पासून राबवण्यास सुरुवात झाली. दिनांक 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत ‘माझी वसुंधरा अभियान- चार’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात आले.
या अभियानात राज्यातील 414 नागरी स्थानिक संस्था व 22,218 ग्रामपंचायती अशा एकूण 22,632 स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.या अभियानासाठी केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन व फील्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात आले.एकूण गुणांच्या आधारे अभियानामधील विजेते जाहीर करण्यात आले असून लवकरच या पुरस्काराचे वितरण मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे.श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर गणपतराव पाटील यांनी धरणगुत्ती गावचे माजी सरपंच तसेच दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, सरपंच विजया कांबळे,उपसरपंच विलास जाधव,आप्पासाहेब पाटील,मनोहर माळी,भालचंद्र लंगरे,भाऊसो कांबळे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत केंबळे,धीरज लंगरे,यश लंगरे व ग्रामस्थांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच गाव विकासासाठी विविध शासकीय योजना आणि गाव सहभागातून विविध विकासकामे करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी दत्त कारखान्याचे सचिव अशोक शिंदे उपस्थित होते.